Sunday 18 December 2016

संपूर्ण नागपूर होणार वायफाय --- मुख्यमंत्री फडणवीस

·        मनपाच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे उद्घाटन

नागपूर दि. 17 -:  नागपूर हे स्मार्ट सिटी होणारच आहे. सोबतच संपूर्ण नागपूरला वायफाय करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशवंत स्टेडियम येथे नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित नागपूर महोत्सवात ते बोलत होते.
कार्यक्रमाला रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नागपूरचे महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, नागपूर महोत्सवात नागपूरचा लोगो लॉन्च करण्यात आला आहे. नागपूर महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहून वाटते की, हा महोत्सव नागपूरकरांनी स्वीकारला आहे. त्यामुळे हा लोकांचा महोत्सव आहे. विदर्भ आणि विशेषत: नागपूर हा भाग कोळशासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व वेस्टर्न कोल्डफिल्ड लि.ने सुरु केलेले माईन टुरिझम ही एक नवीन संकल्पना आहे. या टुरिझमचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महानगरपालिकेने ग्रीन बस सुरु केली आहे. देशात सर्वोत्तम काम करणारी महानगरपालिका म्हणून नागपूरचा उल्लेख होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या 42 मीटर उंच टर्न टेबल लॅडर व क्वीक रिस्पॉन्स व्हेईकलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात ग्रीन व्हीजन फाऊंडेशन, ग्रीन अँड क्लीन फाऊंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माईन टुरिझम, वेस्टर्न कोल्डफिल्डच्या इको पार्कच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सोबतच ऑरेंज सिटी कॉफीटेबल बुक, विदर्भ बुकलेट, मॅप ऑफ नागपूर आणि नागपूर महोत्सव 2016 स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे तसेच एमटीडीसी आणि वेस्टर्न कोल्डफिल्डचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                          00000 

No comments:

Post a Comment