नागपूर, दि. 14 : गडचिरोली जिल्हयाच्या सर्व दुर्गम भागापर्यंत बँकीग सेवा उपलब्ध होतील यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तंत्रज्ञानाच्या मदतीने सुसज्ज करावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज विधान भवनातील सभागृहात घेतला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास आणि वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्ण गजबे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी, पालक सचिव विकास खारगे आदिची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शान्तनु गोयल आदींचीही यावेळी उपस्थित होती.
आरंभी गडचिरोली पोलिस दलाने कमीत कमी खर्चात तयार केलेल्या ‘कनेक्टींग गडचिरोली’ या व्हिडीओ कॉन्फरन्सींगचे उद्घाटन झाले. जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यांशी संपर्क साधण्याची ही यंत्रणा आहे. याच्या प्रकल्प अहवालाचे विमोचन मुख्यमंत्र्यांनी केले. याबाबत गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांनी यावेळी सादरीकरण केले.
बैठकी दरम्यान याच प्रकारची यंत्रणा उपलब्ध करुन देऊन गडचिरोली जिल्हयातील सर्व शाळा डिजिटल शाळा बनवून त्यांना संपर्क साधता येईल. याबाबत मी वित्त विभागाला आदेश देणार आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, आरोग्य विभागानेही सर्व ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या पध्दतीने जोडावीत असे निर्देश दिले.
दळणवळण नसल्याने आपणास आपल्या समस्या मुंबई पर्यंत मांडता येत नाहीत अशी स्थिती होती. मात्र आता हा संपर्क सेतू निर्माण झाला असल्याने आपला समस्या मांडता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन गावागावात बँकींग यंत्रणा निर्माण करावी आणि याबाबत केलेला कामाची माहिती दोन महिन्यानंतर मुंबईत बैठकीत सादर करावी, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शेततळे/विहिरी
गडचिरोली जिल्ह्यास जलयुक्त शिवार मध्ये 169 गावात कामे करायची आहेत त्यापैकी 122 गावात कामे सुरु झाली आहेत. मागेल त्याला शेततळे अंतर्गत 1390 चे उद्दिष्ट आहे. तर धडक विहीर अंतर्गंत 4500 चे उद्दिष्ट आहे तर धडक विहीर अंतर्गत 4500 चे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 800 कामांची सुरुवात झाली आहे. जिल्हयात या सर्व कामात जे.सी.बी.ची कमतरता भासत आहे, असे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले. यातील सर्व उर्वरित कामे जिल्हा परिषद आचारसंहितेपूर्वी सुरु करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बंधारे
कोरगल बंधाऱ्यासाठी वन विभागाला 1 कोटी 37 लाख रुपये देणे बाकी आहेत ते आठ दिवसात दिले जातील, असे जलसंपदा सचिव आय.एस. चहल यांनी या बैठकीत सांगितले. जिल्हयात 9 प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी 5 प्रकल्प सुरु करणे शक्य आहे. उर्वरित प्रकल्पांना राज्यपालांच्या निर्देशामुळे स्थगीत ठेवण्यात आलेले आहे. या कामासाठी खास बाब म्हणून मान्यता घ्यावी अशी आग्रही विनंती खासदार नेते व आमदार डॉ. होळी व गजबे यांनी यावेळी केली.
अहेरी येथे देखील महिला रुग्णालयाची मान्यता आहे. परतु बांधकामासाठी निधी नाही तो लवकर देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणाद्वारे माहिती बैठकीत मांडली.
****


No comments:
Post a Comment