Wednesday, 14 December 2016

विधान भवनातून मुख्यमंत्र्यांनी साधला भामरागड येथील नागरिकांशी थेट संवाद


  • पोलिस विभागाच्या कनेक्टिंग गडचिरोली ’ प्रकल्पाचे उद्धाटन


नागपूर, दि. 14 : गडचिरोली पोलिस विभागाने विकसित केलेल्या कनेक्टिंग गडचिरोली या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात उद्धाटन केले. वैशिष्ट्य म्हणजे या संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील विधान भवनातून थेट गडचिरोलीतील भामरागड येथील नागरिकांसोबत संवाद साधला.
यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, कृष्णा गजभिये, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, अपर मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तव, नक्षल विरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक शिवाजी बोडखे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.आर.एस. नायक, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मंजूनाथ सिंगे आदी उपस्थित होते.
भामरागड येथे आयोजित जनजागरण मेळाव्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलिस विभागाने विकसित केलेली ही संपर्क यंत्रणा अतिशय नाविण्यपूर्ण आणि  महत्वाची आहे. या माध्यमातून मी थेट आपल्यासोबत संवाद करू शकतो. आपल्या समस्या जाणून घेऊ शकतो. एकप्रकारे सरकार आपल्या दारी आले आहे. या संपर्क यंत्रणेमुळे कायदा आणि सुव्यवस्था उत्तमरित्या राखण्यासोबतच सरकारच्या योजना थेट आपल्यापर्यंत पोहचविण्यास मदत होईल. कनेक्टिंग गडचिरोली या उपक्रमांतर्गत आता गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या उत्तम सुविधा पुरविण्यात येईल. आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक असा आहे. या यंत्रणेमुळे नागपूरातूनच काय यानंतर मुंबईतील विधान भवनातूनसुध्दा मला आपल्यासोबत बोलता येईल. गडचिरोली जिल्हयाच्या विकासाकरीता शासन कटीबध्द आहे. राज्य सरकार याबाबत कुठेही कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी भामरागड येथील जनजागरण मेळाव्याल्या उपस्थित असलेली आश्विनी या विद्यार्थीनीने संपर्क सेतुच्या माध्यमातून विधान भवनात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. आमच्या गावाला एक वाचनालय बांधून द्या, अशी मागणी तिने मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर त्यांनी लगेच होकार दर्शविला. एवढेच नाही तर डिजिटल वाचनालय बांधण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. ई- वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना सर्व पुस्तके वाचता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. इयत्ता 9वी मध्ये असलेल्या दिलीपने आमच्या गावचा रस्ता पूर्ण करून द्या, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला रस्ता बांधण्यासाठी सूचना केल्या. तर एका विद्यार्थीनीने तालूक्याला क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली असता प्रत्येक तालूक्यात क्रीडा संकुलाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
तत्पूर्वी विधानभवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्षेत्रफळाने गडचिरोली हा अतिशय विस्तीर्ण जिल्हा आहे. घनदाट जंगल असलेल्या या जिल्ह्यात संपर्क यंत्रणेची कमतरता होती. मात्र पोलिस विभागाच्या स्तुत्य उपक्रमाने गडचिरोलीला हाकेच्या अंतरावर आणले आहे. ही यंत्रणा केवळ पोलिस विभागापुरतीच मर्यादीत न राहता गडचिरोलीतील इतर विभागांनी त्याचा उपयोग करावा. जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र या माध्यमातून कसे जोडले जाऊ शकते, याबाबत अधिका-यांनी अभ्यास करावा. एक वेळ अशी होती की, गडचिरोलीला निरोप पाठविण्यासाठी माणूस पाठवावा लागत असे. मात्र कनेक्टिंग गडचिरोली या उपक्रमामुळे सरकार थेट नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. पोलिस सक्षम झाले की संपूर्ण प्रशासनाला त्याचा फायदा होतो. भविष्यात रेशनिंगची व्यवस्था ऑनलाईन पध्दतीने अधिक पारदर्शक करण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी पडेल. तसेच बँकींग नेटवर्क ग्रामीण भागापर्यंत उपलब्ध करून देता येईल. सर्व विभागाने अशी प्रणाली विकसीत करावी, अशा सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.
या उपक्रमासाठी प्रयत्न करण्यासाठी सर्व पोलिस विभागाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

*****

No comments:

Post a Comment