Saturday 17 December 2016

प्रेस क्लबच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - मुख्यमंत्री फडणवीस




बंगला हस्तांतरण व करार
नागपूर, दि. 17 : नागपूर येथे प्रेस क्लब व्हावा असे माझे व माझ्या पत्रकार बांधवाचे स्वप्न होते. यानिमित्ताने सर्वांच्या सहकार्याने हा प्रेस क्लब सुरु होत आहे. बंगल्याचे हस्तांतरण व करारावरील स्वाक्षरी माझ्या समक्ष होत असल्यामुळे एक चांगला प्रेस क्लब विकसीत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु. अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आज 17 डिसेंबर रोजी सिव्हिल लाईन नागपूर येथील स्वाती बंगला प्रेस क्लब ऑफ नागपूर यांचेसाठी हस्तांतरण व करारावर स्वाक्षरी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह, नागपूर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सुयोग पत्रकार निवास शिबीर प्रमुख दिलीप जाधव, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबईला अधिवेशन काळात सायंकाळी पत्रकार मित्रांसोबत प्रेस क्लबमध्ये जेवण करायचो, त्यांच्याशी गप्पा करत असतांना वाटायचे की, नागपूरला सुध्दा असा प्रेस क्लब असावा. मुख्यमंत्री झाल्यावर इथल्या पत्रकार संघाचे पदाधिकारी याविषयी मला भेटले. प्रेस क्लबसाठी जागा शोधण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एखादा बंगला मिळाल्यास तेथे तात्काळ प्रेस क्लब सुरु करता येईल. असे सांगितले. नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश भूषण गवई यांना स्वाती बंगला प्रेस क्लबला मिळावा, अशी विनंती केली. त्यांनी सुध्दा बैठक घेऊन सदर बंगला प्रेस क्लबला वापर करण्यासाठी मान्यता देण्याचे सांगितले.
टिळक पत्रकार संघाच्या इमारतीच्या विकासासाठी राज्य सरकार सहकार्य करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर येथील पत्रकार कॉलनीचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यात येतील. नवीन पत्रकार कॉलनी तयार झाली पाहिजे यासाठी पुढाकार घेण्यात येईल. नागपूर येथील प्रेस क्लब सुरु झाल्या नंतर आपण नक्की येणार असून, मुंबईच्या प्रेस क्लबमधील जेवणासारखे रुचकर जेवण इथेही मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वाती बंगल्याची पाहणी केली. प्रेस क्लब ऑफ नागपूरसाठी 37 हजार स्केअर फुटचा स्वाती बंगला उपलब्ध झाला असून, या बंगल्याचे हस्तांतरण व करारावर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 सदर चे कार्यकारी अभियंता संजय इंदुरकर व नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी स्वाक्षरी केली.
नागपूर प्रेस क्लबचे पहिले पॅट्रन सदस्य म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा प्रदीपकुमार मैत्र यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला पत्रकार बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रदीपकुमार मैत्र यांनी केले. संचालन सरिता कौशिक यांनी तर उपस्थितांचे आभार ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी मानले.
                                             ******

No comments:

Post a Comment