Saturday 17 December 2016

समाजजागृतीसाठी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करा - आशिष आवारी

नागपूर दि.१७  समाजसेवा कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेत, समाजजागृती करण्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे उपप्रबंधक आशिष आवारी यांनी केले. ते मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मानवाधिकार हक्कांचे संरक्षण या विषयावर बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. जॉन मेनाचेरी ॲड. सोनाली सावरे, उच्च न्यायालयाच्या विधी सेवा उपसमितीचे एन. डब्ल्यू डोये यांची प्रमुख उपस्थिती होती.
             विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आतापर्यंत वेगवेगळे क्लब असल्याचे पाहिले आहे. मात्र, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयात मानव अधिकार क्लब असल्याचे प्रथमच पाहतो आहे. त्यामुळे संस्थेचे अभिनंदन करत त्यांनी विद्यार्थ्यांना मानवाधिकार आयोग आणि त्याचे प्रभावीपणे कार्य करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले पाहिजेत, यावर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. मानवाधिकार आयोगाची स्थापना १९९३ मध्ये झाली असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशावर मोठे उपकार केले असून, त्यांनी भारतीय संविधानात हे नमूद केले आहे. त्यांनी पर्यायाने संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क प्रदान करत मानवाधिकार कायद्याची बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळे समाजकार्याचे विद्यार्थी म्हणून समाजात वावरताना जिथेही मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत असेल तिथे निर्भिडपणे काम करा. आणि समाजात दीपस्तंभाप्रमाणे कार्य करा, असे त्यांनी सांगितले.
             ॲड . सोनाली सावरे यांनी विद्यार्थ्यांना मानवाधिकार हक्काबाबत सविस्तर माहिती दिली. मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्या तक्रारीचा अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. ज्योती निसवाडे यांनी आभार मानले.
                                                                                      ****

No comments:

Post a Comment