Friday, 2 December 2016

पुढील पाच वर्षात पन्नास हजार तरुणांना रोजगार नागपूरला भारतातील सर्वात सुंदर शहर बनाविनार - नितीन गडकरी



* पन्नास हजार लोकांसाठी घराची योजना
                     * चोवीस तास शुद्ध पिण्याचे पाणी
                         * 9 हजार कोटीच्या मेट्रोच्या कामास सुरुवात
नागपूर, दि. 23 : केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकारातून नागपूर शहराची वाटचाल देशातील सर्वात सुंदर शहराच्या दिशेने सुरु आहे. 9 हजार कोटीच्या मेट्रोच्या कामास गती प्राप्त झाली आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठ नागपुरात येऊ घातली आहेत. 9780 तरुणांना मिहानमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे तर पुढील पाच वर्षात पन्नास हजार तरुणांना रोजगार मिळेल. शहरात नागरिकांना 24 तास पिण्याचे पाणी मिळणार आहे. 400 कोटीच्या सीमेंट रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. अशा विविध विकास कामाच्या माध्यमातून नागपूर शाहरास देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते शास्त्रीनगर खामला येथे मुख्य मलजल वाहिकेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, मिलिंद माने, मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर, मनपा कर सभापती गिरीष देशमुख, नगरसेवक पल्लवी शामकुळे, दयाशंकर तिवारी, संदीप जोशी व मनपाचे डॉ. रामनाथ सोनवणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
       11 कोटी रुपये खर्च करून हिंगणा टी पॉईंट ते सहकारनगर घाटापर्यंत मुख्य मलवाहिनी टाकण्याचे कामाचे भूमिपूजन खामला प्रभाग 69 शास्त्रीनगर नागपूर येथे  केंद्रीय मंत्री  नितिन गडकरी यांचे हस्ते झाले. मलजल वाहिनीचे काम 12 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या मलजल वाहिनीमुळे या भागातील नागरिकांना सिव्हरेजच्या पाण्याचा त्रास होणार नाही. मलजल वाहिनीचे काम करण्याची मागणी या भागातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून होती, ती आज  शासनाने पूर्ण केली आहे.  शासनाने यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी दिला असून  2 कोटी महानगरपालिका देणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामास आज सुरुवात झाली असुन दूसरा टप्पा येत्या दोन महिन्यात सुरु होईल असे श्री. गडकरी यांनी सांगितले.
याच भागात लंडन स्ट्रीटचे काम होणार आहे, तो आता ऑरेंज स्ट्रीट म्हणून विकसित केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी  सांगीतले. या स्ट्रीटवर व्यायामशाळा, सुसज्ज रुग्णालय, मार्केट, पार्किग, स्विमिंग पूल व अन्य आधुनिक सोई उपलब्ध असतील. या स्ट्रीटवर मेट्रो करण्याचा विचार होता पण मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार आता आधुनिक पध्दतीची रेल्वे उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
           यावेळी बोलतांना पालकामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितिन गडकरी यांच्या पुढाकारने केवळ दोनच वर्षात नागपूरच्या विकासासाठी 30 हजार कोटी रूपये आले आहेत. यातून नागपूर शहराचा कायापालट होणार आहे. मलजल वाहिकेसाठी मुख्यमंत्री यांनी तात्काळ निधी मंजूर केला असे सांगून ते म्हणाले की, या भागात अंडरग्राउंड वीज टाकली जाणार आहे. एखाद्या नाल्यासाठी एवढा मोठा निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगीतले. आता नागपूर शहर बदलत आहे, 125 कोटी रूपये खर्च करून साई ही खेळाशी संबंधित संस्था नागपुरात उभारली जाणार आहे. दोन हजार प्रेक्षक क्षमता असलेले सुरेश भट सभागृहाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी महापौर प्रवीण दटके यांचे भाषण झाले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment