Monday 30 January 2017

राष्ट्रीय मतदार दिनी नवमतदारांच्या प्रोत्साहनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन - सचिन कुर्वे


  • 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस
  • यशस्वी युवा आदर्शांचा गौरव
  • राज्यस्तरीय मतदार दिनाचे बुधवारी आयोजन

नागपूर, दि. 23 :  लोकशाही प्रक्रियेमध्ये नवमतदारांचा सहभाग वाढावा, तसेच मतदारांनी मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य बजावावे यासाठी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवसाचा राज्यस्तरीय कार्यक्रम बुधवार, दिनांक 25 जानेवारी रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन आयोजना संदर्भात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या प्रमुख उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहड, महसूल उपायुक्त जितेंद्र पापडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लिना फलके आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली होती. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नवमतदारांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात युवकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार, ज्येष्ठ समाज सेवक डॉ. विकास आमटे, कुलगुरु डॉ. सिध्दार्थ विनायक काने, ज्येष्ठ गांधीवादी श्रीमती विभा गुप्ता, विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशस्वी युवा आदर्शांचा सहभाग
लोकशाही प्रक्रियेमध्ये नवतरुण मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी माजी क्रिक्रेट पटू प्रशांत वैद्य, तरुण उद्योजक हसन शफिक, प्रशासकीय अधिकारी अमन मितल, प्रसिध्द सर्जन डॉ. समीर जहागीरदार, बॅडमिटन पटू श्रीमती अरुणदती पानतावणे, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती मल्लिका भांडारकर हे नवमतदारांना प्रोत्साहन देणार आहेत.
यावेळी तरुण नवमतदारांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच मतदार झालेल्या युवकांना छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करुन लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात येणार आहे.
मतदार जागृतीनिमित्त विविध महाविद्यालयातील 15 ते 17 वयोगटातील मतदारांना मतदानाचे महत्व तसेच मतदान प्रक्रियेविषयी माहिती देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांचा सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
जिल्हयात 37 लाख 54 हजार 948 मतदार
मतदानामध्ये युवा मतदार व महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हास्तरावर विशेष प्रयत्न करण्यात आले. यामध्ये 16 सप्टेंबर  रोजीच्या मतदार यादीनुसार 37 लाख 54 हजार 948 मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये 19 लाख 47 हजार 005 पुरुष मतदार व 18 लाख 7 हजार 865 महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या 78 आहे.
नवीन कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी व वगळणी व स्थांनतरण झालेल्या 1 लाख 15 हजार 204 अर्जांपैकी 97 हजार 916 मतदारांचा नव्याने समावेश झाला असून यामध्ये 44 हजार 306 महिला मतदारांचा समावेश आहे.
मतदार नोंदणीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये जिल्हयांतर्गत नोडल अधिकाऱ्यांचे नियुक्ती, स्टूडंट अॅम्बेसिडर  व कॅम्प ॲम्बेसिडर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून नियोजनबध्द पध्दतीने पात्र युवकांना मतदार करुन घेण्यात आले आहे.
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहड यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली.

0000000

No comments:

Post a Comment