Monday 30 January 2017

आदर्श आचार संहितेची कठोर अंमलबजावणी करा - ज.स. सहारिया


महानगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांचा आढावा
नागपूर, दि.23 : नागपूर महानगरपालिका तसेच वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपायोजनांची अंमलबजावणी कठोरपणे करा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आज नागपूर येथे दिलेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात निवडणूकीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्व तयारीचा  आढावा श्री. सहारिया यांनी घेतला.  याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करतांना मतदारांवर प्रभावासाठी दारु, रोख रक्कम अथवा वस्तूरुपाने साहित्य वाटप होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करतांना राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया म्हणाले की, पहिल्यांदाच  रेल्वे, वन विभाग, बँक तसेच आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांची मदत घेणार असून इतर राज्यातून येणारे रेल्वे व इतर वाहतूकीवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.
उमेदवारांना नामनिर्देशन पत्र संगणकाच्या सहाय्याने भरावयाचे असल्यामुळे उमेदवार  त्यांच्या सोयीप्रमाणे नामनिर्देशन पत्र भरता येईल. तसेच नामनिर्देशन पत्र नामंजूर होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. संगणकाच्या सहाय्याने नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सहाय्य व मदत व्हावी यासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलिस विभागानेही आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना पूर्ण केल्या आहेत.
नागपूर महानगरपालिका तसेच वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुकीची तयारी योग्य दिशेने सुरु असून मतदानासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व मतदान यंत्र उपलब्ध आहेत.  तीन जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 159 गट व 318 गणामध्ये निवडणुका घेण्यात येणार असून 26 लक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 1456, वर्धा 1113 व गडचिरोली जिल्ह्यात 998 अशी एकूण 3567 मतदान केंद्र राहणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेमध्ये 151 जागेसाठी मतदान घेण्यात येणार असून 2800 मतदान केंद्र राहणार आहेत. 12 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून एक खिडकी योजनेद्वारे उमेदवारांना विविध परवाणग्या देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी 16 पथके निर्माण केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत शपथपत्राद्वारे माहिती देणे. बंधनकारक असून उमेदवारासंदर्भात मतदारांना माहिती असावी यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात स्वरुपात तसेच मतदान केंद्राच्या बाहेर फ्लॅक्सवर माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांचे शिक्षण, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, असलेले गुन्हे, झालेली शिक्षा व प्रलंबित असलेले गुन्हयासंदर्भात माहितीचा समावेश आहे.
उमेदवारांना खर्चाची माहिती देणे बंधनकारक असून तपासणीसाठी आयकर विभागाच्या चमुची मदत घेण्यात येणार आहे. मतदारांनी मतदानांचा हक्क बजावावा यासाठी विशेष उपक्रम राबवावे अशी सूचना करताना येत्या निवडणूकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपिन बिहारी, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलिस आयुक्त  डॉ. के. व्यंकटेशम, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप सिंह पाटणकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, वर्धाचे जिल्हाधिकारी शैलेश नवल तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment