Thursday 26 January 2017

एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या --- सचिन कुर्वे


  • 29 जानेवारीला 1799 गावात पल्स पोलिओ मोहिम
  • 2528 लसीकरण केंद्र
  • 2 लाख 14 हजार 494 बालकांना लस पाजणार

    नागपूर दि. 17 : एकही मूल पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने जिल्ह्यातील 5 वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्ह्यात 29 जानेवारी व 2 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. शून्य ते 5 या वयोगटातील एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने प्रत्येक गावातील बालकांचे सर्वेक्षण करुन त्यादृष्टीने नियोजन करण्याचा सूचना करताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, पल्स पोलिओ जनजागृतीसाठी ग्रामस्तरावर 26 जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित करुन ग्रामसभेसमोर बालकांचा नावाची यादीचे वाचन करावे. व सुटलेल्या बालकांचा नावाचा या यादीमध्ये समावेश करावा.
लसीकरण मोहिम राबविताना ग्रामीण भागात 2 हजार 317 बूथ तयार करण्यात येत असून नागरी क्षेत्रात 211 बूथचा समावेश राहणार आहे. लसीकरण केंद्रामध्ये सर्व नागरिकांना सहजपणे पोहचता यावे यासाठी अंगणवाडी अथवा शाळांमध्ये बूथ लसीकरण केंद्र ठेवण्यात यावे. 29 जानेवारीला सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजल्यानंतर पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन बालकांच्या यादीनुसार तपासणी करावी, अशी सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणासाठी मोबाईल टीम तसेच विविध उद्योगामध्ये बाहेरुन आलेल्या कामगारांच्या मुलांना पोलिओचा डोस देणे तसेच एसटी बसस्टँड, टोलनाके, यात्रास्थळे व गर्दीच्या ठिकाणीही बालकांना लस देण्याची व्यवस्था करावी. जिल्ह्यात 5 वर्षाखालील ग्रामीण भागात एक लाख 80 हजार 422 तर शहरी भागात 36 हजार 574 अशी दोन लाख 16 हजार 986 बालके आहेत. या सर्व बालकांना लसीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले.
223 मोबाईल टीम तयार करणार
लसीकरण मोहिमे संदर्भात घरोघरी माहिती पोहचावी यासाठी शाळेतील मुलांचा सहभाग घेऊन त्या मुलांचा टोळ्या तयार कराव्यात. मुले प्रत्येक भागात जाऊन बालकांचा शोध घेतील व अशा बालकांच्या पालकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणतील. यादृष्टीने शाळांमध्ये जागृती करावी व लसीकरणाच्या दिवशी गावात प्रभात फेरी काढावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवी संघटनाचाही सहभाग घेण्यात येणार आहे. बाहेर गावहून आलेल्या बांधकाम, कृषी, विटभट्टी तसेच औद्योगिक क्षेत्रातील आस्थांपणामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांचा मुलांना लसीकरण करण्यासाठी 223 मोबाईल टीम तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी सांगितले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.साजीव, कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. चहांदे, साथरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वाळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. त्यागी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.

*****

No comments:

Post a Comment