Friday 31 March 2017

देवी-देवता,महापुरुषांच्या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदा आणणार -- राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ३० : राज्यभरात अनेक ठिकाणी देवी देवता, महापुरुष आणि गड किल्ल्यांच्या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत कायदा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात कायदा आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.
     विधानपरिषद सदस्य अमरसिंह पंडित यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. राज्यभरात अनेक ठिकाणी महापुरुष आणि गड-किल्ल्यांच्या नावाचा वापर बिअर बार, परमिट रुम, मांसाहारी खानावळ, लोकनाट्य कला केंद्र तसेच देशी दारू विक्री केंद्रांना नावे देण्यासाठी करण्यात येतो.  देवी-देवतांच्या नावांचाही गैरवापर होत असल्याची लक्षवेधी श्री. पंडित यांनी विधानपरिषदेत मांडली होती. यावर उत्तर देताना श्री. बावनकुळे बोलत होते.
 श्री. बावनकुळे म्हणाले की,  देवी-देवता व थोर महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणे हे चुकीचे आहे. मात्र, यासंदर्भात सध्या कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. यासाठी कामगार विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग मिळून हा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
चर्चेत विधानपरिषद सदस्य भाई गिरकर, डॉ. नीलम गो-हे, रामहरी रुपनवर यांनी सहभाग घेतला.
00000

No comments:

Post a Comment