Friday 21 April 2017

कृषी उत्पादन वाढविण्यासाठी उत्कृष्ट बियाणे खतांचा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरवठा करा - चंद्रशेखर बावनकुळे


  • खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा
  • 5 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपचे नियोजन
  • तूर, कापूस, सोयाबिनच्या क्षेत्रात वाढ
  • प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मृदा आरोग्य पत्रिका
  • सिंचनाखाली क्षेत्र वाढविण्यासाठी आराखडा

नागपूर, दि.21 :   उन्नत शेती, समृध्द शेती या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी उत्कृष्ट बियाणासोबतच खतांचा मागणीनुसार  पुरवठा करा, तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात खरीप हंगामपूर्व बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री बावनकुळे बोलत होते. यावेळी मागील वर्षाच्या कृषी उत्पादनाचा आढावा तसेच 2017-18 साठी खरीप कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी खासदार विकास महात्मे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, प्रा. जोगेंद्र कवाडे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खरीप आढाव्याचे नियोजन करताना तालुका स्तरावर लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरीप नियोजन करताना आधुनिक तंत्रज्ञानासह उत्पादन वाढीसाठी सूचविण्यात आलेल्या योजनासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तहसिलदारांनी सर्व विभागांचा अधिकाऱ्यांसह प्रत्येक गावात बैठक घ्यावी. शेतकऱ्यांच्या जीवनमानात प्रत्यक्ष परिवर्तन आणण्यासाठी या बैठकीमध्ये मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शेतकऱ्यांना बियाणे व खतांसदर्भात अडचण जाणार नाही यादृष्टीने प्रत्येक केंद्रामध्ये दरपत्रक ठळकपणे लावण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना तक्रार करायची असल्यास दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावा. अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक गावातील वॉटक टेबल तयार करुन तालुका स्तरांवर एकत्र माहिती उपलब्ध करुन द्यावी. सिंचन क्षमता वाढविण्यासंदर्भात बोलतांना ते पुढे म्हणाले की, विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष सिंचन क्षमता व उपलब्ध झालेली सिंचन क्षमता याचा आढावा घेवून जेथे सिंचन होवू शकत नाही अशा ठिकाणी पर्यायी सिंचनासंदर्भात उपाययोजनाही 15 मे पर्यंत सादर कराव्यात.
खरीप पिकांच्या नियोजनाचा आढावाघेतांना जिल्हात मागील वर्षात 4 लाख 76 हजार हेक्टर क्षेत्रात नियोजन करण्यात आले असून यामध्ये सोयाबिनच्या क्षेत्रात 25 टक्के घट झाली असून यावर्षी 5 लाख 4 हजार 300 हेक्टर क्षेत्रात नियोजन करण्यात आले असून 94 हजार 200 हेक्टर क्षेत्रात भात, 60 हजार हेक्टर क्षेत्रात तूर, 2 लाख 15 हजार हेक्टर क्षेत्रात कापूस तर 1 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबिन पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी 85 हजार 629 क्विंटल बियाण्यांची तसेच 1 लाख 42 हजार मेट्रीक टन खतांची आवश्यकता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खरीप कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली असून 125 टक्के वितरणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहेत. मागील वर्षी 70 हजार 734 सभासदांना खरीप व रब्बी मिळून 971 कोटी 43 लक्ष रुपयाचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकांनी, तर सहकारी बँकांनी 32 कोटी 85 लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले होते.
शेतकऱ्यांना जमीन आरोग्य प्रत्रिका वितरणाचा दोन वर्षाचा कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला असून मागील वर्षी 1 लाख 34 हजार 282 शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या होत्या, तर 2018-19 वर्षात 1 लाख 34 हजार 283 अशा एकूण 2 लाख 68 हजार 565 जमीन आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात येणार आहे. प्रधान मंत्री सिंचन योजनेअंतर्गत मागील वर्षी 1 हजार 970 शेतकऱ्यांना 2 हजार 145 क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यात आला होता यासाठी 436 लाख 59 हजार रुपये खर्च झाला आहे. यावर्षी 2 हजार 417 लाभार्थ्यांना 2 हजार 645 हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.
उत्पादन वाढीसाठी विशेष कार्यक्रम अंतर्गत कापूस, सोयाबीन, भात, तूर आदी पिकांना प्रोत्साहन देण्यात येत असून शेतकऱ्यांनाही उत्‍पादन वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत करुन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस विविध पिकांच्या नियोजनासोबतच बियाणे, खते आदीबाबतही या बैठकीत माहिती दिली. जिल्हयातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज सहज व सूलभपणे व्हावे यासाठी तालुकास्तरावर विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असून जिल्हयात खरीप हंगामासाठी 659 कोटी 3 लक्ष रुपये तर रब्बी हंगामासाठी 247 कोटी 46 लक्ष रुपये असे एकूण 916 कोटी 49 लक्ष रुपये कर्ज वितरणाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. तसेच सहकारी बँकांना 45 कोटी उद्दिष्ट देण्यात आले आहे.
तूर खरेदी करण्यासाठी केंद्र सुरु ठेवा
जिल्हयातील शेतकऱ्यांकडील तूर खरेदीसाठी सुरु करण्यात आलेली सर्व केंद्र तूर खरेदी बंद होईपर्यंत सुरु ठेवावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांनी केली. नाफेडतर्फे चार केंद्रावर 54 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आले आहे. विदर्भ मार्केटिंगद्वारा नऊ केंद्रावर 53 हजार क्विंटल अशी एकूण 1 लाख 7 हजार क्विंटल तूरीची खरेदी झाली आहे. तूर खरेदी करताना आवश्यक बारदाना तसेच तूरीचे खरेदी केल्या तूरचे संरक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
खरीप नियोजनासंदर्भात 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत तहसिलदारांनी प्रत्येक गावात जावून सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठकी आयोजित कराव्यात यामध्ये लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करावे, अशी सूचना करताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पिक पध्दती, उत्पादन वाढविण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासोबत खरीप नियोजनासंदर्भात माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे आदींनी खरीप हंगाम नियोजना संदर्भात विविध सूचना केल्यात. सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबत यावेळी सूचविण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी आभार मानले. यावेळी कृषी, सिंचन, फलोत्पादन, महसूल, जिल्हा परिषदेसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000000

No comments:

Post a Comment