Friday 28 April 2017

यशस्वी होण्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही - प्रफुल्ल मारपकवार


माहिती केंद्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन

   नागपूर, दि. 26  : जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. तुमची मेहनतच तुम्हाला यश शिखरावर घेवून जाते. यासाठी स्वावलंबन आणि कठोर मेहनतीची तयारी बाळगल्यास प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशश्री गवसेल असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांनी आज व्यक्त केला.
सीताबर्डी येथे माहिती व जनसंपर्क विभागाच्या माहिती केंद्रामध्ये आज ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांनी येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर तसेच माहिती केंद्राच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.
राजकीय संपादक पदाचा अनुभव कथन करताना प्रफुल्ल मारपकवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रसार माध्यमांमध्ये राजकीय बाबींवर लिखाण करणे ही अत्यंत जोखमीची बाब आहे कारण एका चुकीच्या वृत्तामुळे एखाद्या राजकीय व्यक्तीची कारकीर्द नामशेष होवू शकते अथवा एखाद्या व्यक्तीची राजकीय कारकीर्द नावारूपाला देखील येवू शकते, एवढी ताकद प्रसार माध्यमातील लेखणीला आहे. यासाठी राजकीय विषयावर भाष्य करताना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या राजकीय बदलांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे ते म्हणाले की, मी विदर्भाचा असून, मुंबईत जावून चांगली कारकीर्द बनवू शकलो कारण मी आजही आपल्या विषयात 18 तास काम करतो आहे.  मी विदर्भाचा म्हणून कधीच न्यूनगंड बाळगला नाही. तुमची मेहनत हिच तुमची खरी ओळख आहे. आज मुलांची वाचनाची आवड कमी होत आहे. ही बाब स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी मारक आहे. गुगलवर सर्वच प्रश्नांची उत्तरे गवसत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माहिती व जनंसपर्क विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नागपूर येथील माहिती केंद्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. अभ्यासाची तयारी सर्वच विद्यार्थी करतात. परंतु अभ्यास नेमका कसा करावा याबाबत अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यासाठी विद्यार्थ्यांना माहिती केंद्राची विशेष मदत होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी मानले.
******

No comments:

Post a Comment