मुंबई, दि. 27 :भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार विषयक संबंधात इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचा वाटा महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले.
13व्या इंडो-अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स ॲवार्डचे वितरण श्री. देसाई यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडन्ट येथील रिगल हॉलमध्ये करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. देसाई म्हणाले, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. मेक इन इंडियाच्या यशस्वीतेमध्ये इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचा वाटा महत्वपूर्ण होता. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक अमेरिकन कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला. यापुढेही अमेरिकेसोबतची गुंतवणुक वाढविण्यावर राज्याचा भर असणार आहे. आज अनेक अमेरिकन कंपन्या बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, एरोस्पेस आदी क्षेत्रात कार्यरत आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस तसेच नवीन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि रिटेल व्यापार धोरणामुळे महाराष्ट्रातील विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य बनले आहे. यापुढेही अनेक अमेरिकन कंपन्या राज्यात गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अमेरिकेच्या मुंबईतील कौन्सिल जनरल श्रीमती जेनेफर लॉसन, इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. व्ही. श्रीनिवासन, विभागीय अध्यक्ष सुंदर अडवाणी आदी यावेळी उपस्थित होते. भारत-अमेरिका कॉर्पोरेट क्षेत्रातील टाटा सन्स, केलॉग्ज इंडिया, टेक महिंद्रा, टेमकेन इंडिया आदी दिग्गज कंपन्यांचा श्री.देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
००००

No comments:
Post a Comment