Thursday 31 August 2017

जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न



नागपूर, दि. 31 :   प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानातंर्गत जिल्ह्यातील युवकांना विविध कोर्सेसचे शिक्षण देण्यात येत आहे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळत आहे. कौशल्य विकासाअंतर्गत नाविण्यपूर्ण कोर्सेसचे शिक्षण देवून जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी यावेळी  सांगितले.
            जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली रवीभवन येथे पार पडली.
             यावेळी आमदार गिरीश व्यास, आमदार समीर मेघे, माजी आमदार मधुकर किंमतकर, महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, विदर्भ इंडस्ट्रियल असोसीएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, जिल्हा परिषद  अर्थ व शिक्षण सभापती ऊकेश चव्हाण, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.
            जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचा उद्देश असून त्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे. या माध्यमातून अनेक युवकांना विविध क्षेत्रामध्ये रोजगार मिळाला आहे. असेही खासदार विकास महात्मे यांनी सांगितले.
            महानगर पालिकेच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत पंडीत दिनदयाल उपाध्याय  अंत्योदय योजने अंतर्गत 995 विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग पूर्ण केली आहे. त्यामधील 294 जणांना कॅम्पसव्दारे विविध क्षेत्रामध्ये रोजगार मिळाला आहे. सद्यस्थितीत 960 लाभार्थी ट्रेनिंग घेत आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत ऑटोमोटीव्ह रिपेअर, बँकिंग अँड अकाऊटींग, कन्सट्रक्शन, कुरिअर अँड लॉजीस्टिंग, इलेक्ट्रीकल, फॅब्रीकेशन, गारमेंट मेकींग, हॉस्पिलिटी, मेडीकल अँड नर्सींग यासारख्या विविध कोर्सेसचे शिक्षण देण्यात येत असून  त्यामाध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यातील संबंधित विभागाने केलेल्या कामांचा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आढावा घेतला. यावेळी  जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या कौशल्य विकास आराखडा तयार करणे या विषयावर चर्चा करण्यात आली.
            नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये कन्सट्रक्शन व हॉस्पिटल या क्षेत्रामध्ये रोजगाराची वाढती मागणी लक्षात घेऊन कौशल्य विकासाअंतर्गत युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कौशल्य विकासाअंतर्गत जिल्ह्यातील विविध संस्था प्रशिक्षण देत असून त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यात येतील. तसेच ग्रामीण भागातील युवकांना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेण्यासाठी व त्यांना अधिकाधिक रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. असेही ते म्हणाले.
                कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सुरु असलेल्या कोर्सेस व्यतिरीक्त अन्य नाविण्यपूर्ण रोजगाराभिमुख कोर्सेस विविध विभागांनी  सुचवावे, असे खासदार डॉ. विकास महात्मे यावेळी म्हणाले.
                                                                        *****

No comments:

Post a Comment