Saturday 30 September 2017

समाजातील अत्यंत प्रतिभावान व्यक्तिंना समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाव देणार- देवेंद्र फडणवीस

v  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे उद्घाटन
v  प्रतिक व बोध वाक्याचे अनावरण
v  समता प्रतिष्ठानच्या मुख्य उद्देशिका पुस्तिकेचे अनावरण
नागपूर, दि. 30 :   समाजातील दुर्बल घटकांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासोबतच संशोधन संस्थेच्या माध्यमातून समाजातील अत्यंत प्रतिभावान लोकांना योग्य न्याय देऊन त्यांच्या प्रतिभेला वाव देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय विभागाच्या प्रांगणात आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी समता प्रतिष्ठानच्या समता व्हिजन व मुख्य उद्देशिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे, डॉ.मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त मिलिंद शंभरकर, महासंचालक राजेश धाबरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून केंद्र शासनाने विविध शैक्षणिक तसेच समाजपयोगी राबविले असून या माध्यमातून समाजातील अत्यंत प्रतिभावानांना त्यांच्या प्रतिभेला न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्यातही महाराष्ट्र शासनाने समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता आणण्याकरिता संविधान दिले. या माध्यमातून सामान्य माणसाला मोठी शक्ती दिली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या स्थापनेसोबतच प्रतिष्ठानचे प्रतिक आणि ब्रीद वाक्याचा अनावरण होत आहे. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील प्रतिभेला न्याय देण्यात येईल, अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलित करुन समता प्रतिष्ठानचे विधीवत उद्घाटन केले.
प्रारंभी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक प्रतिष्ठानच्या  स्थापने संदर्भातील उद्देश सांगतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवितांना समाजात समता तसेच जात विरहीत समाज निर्माण करण्यात येईल. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित अभ्यास आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याण व विकासासाठी विविध उपक्रम राबविणे यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे सामाजिक न्यायमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रतिक व बोध वाक्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक गणेश महादेवराव तायडे, द्वितीय पारितोषिक भंते सारिपुत, प्रोत्साहनपर पटेल मोबीन शेखलाल, यशवंत वानखेडे, रघुवीर पंढरीनाथ पवार हे विजयी ठरले आहेत. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता खेलरत्न पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मोना राजेश मेश्राम हिला अकरा लक्ष रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर आभार प्रदर्शन सामाजिक न्याय राज्यमंत्री व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment