Saturday 30 September 2017

असुरी शक्तींवर विजय मिळवून चांगला समाज घडवूया – मुख्यमंत्री

मंचच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेला 32 हजार रुपयांचा धनादेश

नागपूर दि.30 : प्रभू श्रीरामांनी समाजातील सर्व घटकांना संघटित करून विजयाचा मंत्र दिला. आजही समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच असुरी शक्तींवर विजय मिळवून चांगला समाज घडवूया, असे आवाहन करत नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
            जयताळा येथील बाजार मैदानात झुंझार नागरिक मंचच्या वतीने आयोजित (प्रदूषण व पर्यावरण विरूद्ध झुंज) रावण दहन उत्सव -२०१७ कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'संकल्प से सिद्धी तक'च्या यशस्वीतेसाठी राज्याला भ्रष्टाचारगरिबी, जातियता आणि धर्मांधता मुक्त करुयात. असुरी शक्तींवर विजय मिळविण्यासाठी प्रभू श्रीरामांनी समाजातील छोट्या –छोट्या घटकांना एकत्र करुन, सज्जन समाजाच्या निर्मितीचा संदेश आपल्या कर्तृत्वातून दिला. प्रभू श्रीरामांचा हाच संदेश आपण आत्मसात करुन चांगल्या  समजाच्या निर्मितीसाठी काम करुयात, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.
            झुंझार नागरिक मंच मागील १४ वर्षापासून कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजक ॲङ नितीन तेलगोटे, अध्यक्ष किशोर वानखडे व संपूर्ण मंचचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला झुंझार नागरिक मंचचे कार्यकर्ते नानाजी सातपुते यांनी २१ हजार रुपये तर दत्तूभाऊ वानखेडे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
            यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी प्रास्ताविकात स्वच्छ, सुंदर आणि प्रगतशील नागपूरसाठी प्रयत्न करण्याचे नागरिकांना आवाहन केले. तसेच उपस्थित नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येंने नागरिकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment