Saturday 30 September 2017

मेट्रो रेल्वे प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन - देवेंद्र फडणवीस

v  माझी मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनला हिरवी झेंडी
v  मेट्रोमुळे 20 हजार लोकांना रोजगाराच्या संधी
v  समृद्धी महामार्गासाठी कोरीयाचे सहकार्य
v  चांगी विमानतळाप्रमाणेच नागपूर व पुण्याचा विकास
v  एसबीआयच्या महाकार्डद्वारे सर्व सेवांचा लाभ  

नागपूर, दि. 30 : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे जलद दळण-वळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे 20 हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच मेट्रो रेल्वेस्टेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक सेवा व सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे हा प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 नागपूर मेट्रोच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर माझी मेट्रोला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नागपूर मेट्रो प्रकल्प हा शहराचे चित्र बदलणारा महत्वकांक्षी प्रकल्प असून केवळ 27 महिन्यात साडेपाच कि.मी. च्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे.  स्टेट बँक इंडियाच्या महाकार्ड सेवेचा शुभारंभ यावेळी झाला.  
मिहान प्रकल्प परिसराचे मिहान डेपो येथे नागपूर मेट्रोच्या ट्रायल रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा श्रीमती अरुंधती भट्टाचार्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदाताई जिचकार, खासदार कृपाल तुमाने, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, समीर मेघे, डॉ.मिलिंद माने, सुधीर पारवे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय सचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांच्या स्वप्नातील माझी मेट्रो वेगाने आकार घेत आहे. या वेगाने देशातल्या कोणत्याही मेट्रोचे काम पुढे गेले नसल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नागपूर मेट्रो बुटीबोरी, हिंगणा तसेच कन्हानपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. मेट्रो स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे रस्त्यावरील ताणही कमी होईल. मॉरेस कॉलेज टी पाईंट तसेच पुणे येथील स्वारगेट येथे मोठा हब महामेट्रोतर्फे उभारण्यात येणार असून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्टेट बँक इंडियातर्फे महा कार्डचा मेट्रो रेल्वेसाठी शुभारंभ होत असून या कार्डाद्वारे रेल्वेसह सर्व सुविधांसाठी कार्डचा वापर होणार आहे. त्यामुळे महामोबिलिटी कार्ड राज्यातील सर्व मेट्रो, बस, टोल नाके, महानगरपालिका आदी साठी एकत्रितपणे संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्टेट बँकेने मेट्रो सेवा सुरु होण्यापूर्वीच महाकार्ड लाँच केले आहे. बँकेने सुद्धा ही सेवा राज्यात अल्पदरात सुरु करावी, अशी सूचना यावेळी दिली. पोर्टतर्फे वाहतूक मार्गदर्शनासंबंधात ॲप तयार करण्यात आले असून तीनशे मीटर परिसरात जी.पी.एस. सिस्टीमद्वारे वाहतुकीचे मार्गासंदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुविधा नागपूरसह राज्यात सुरु करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी कोरीया येथे झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, या महत्वाकांक्षी मार्गासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा अकरा हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले असून या महामार्गासाठी निधीचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले. देशातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे नागपूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.
नागपूर विमानतळावर कार्गोहब सुविधा उपलब्ध होण्यासोबतच पुणे विमानतळाच्या विकासासाठी जगातील सर्वोत्कृष्ट चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविणाऱ्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज लक्षात घेऊन रोड आणि रेल्वेचा कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. यासाठी निती आयोगाने मान्यता देण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर मेट्रो हा महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अत्यंत चांगल्या दर्जाचे होत असून सौर उर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे सांगतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मेट्रो प्रकल्पासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने महा कार्ड मेट्रो सुरु होण्यापूर्वी सुरु केले आहे. हे कार्ड सर्वत्र वापरता येणार असून या प्रकल्पासाठी उपयुक्त ठरणार आहे. अजनी येथे 800 कोटी रुपये खर्च येणार असून मल्टी मॉडेल हब बांधण्यात येणार असून सर्वसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी सेंट्रल जेल, सिंचन विभागाच्या कॉलनीची जागा तसेच वेअर हाऊसच्या सुमारे 700-800 एकर परिसरावर जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र राहणार आहे.
खापरी येथे कार्गो हब बांधण्यात येणार असून यासाठी केंद्र शासनाने वाराणसी व नागपूर येथे या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम येत्या दोन महिन्यात सुरु होणार असून जगातील सर्व विमाने येथे थांबून इंधन भरण्याचे सुविधा उपलब्ध होईल. अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कार्गोहबमुळे येत्या पाच वर्षात 50 हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नागपूरच्या युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा श्रीमती अरुंधंती भट्टाचार्य म्हणाल्या की, 50 वर्षापूर्वी नागपूरला स्कूटर चालविणारी महिला प्रथम बघितली होती. त्यावेळी नागपूर हे प्रगतीच्या पुढे होते आणि आज मेट्रोमुळे आजही प्रगतीच्या खूप पुढे असणारे शहर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे निश्चलणीकरणानंतर कॅशलेस व्यवहाराकडे सुरुवात झाली असून महा कार्डच्या माध्यमातून मेट्रोसह बस वाहतूक महानगरपालिकेच्या सुविधांसाठी तसेच इतर खरेदीसाठी महा कार्ड सुलभ ठरणार आहे. सर्व व्यवहार एकाच कार्डच्या माध्यमातून होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात या कार्डचा वापर आजपासून सुरु होत असल्याचे यावेळी सांगितले.
प्रारंभी महामेट्रोचे संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रोच्या माध्यमातून जलद व चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न असून 38 कि.मी. लांबीपैकी साडेपाच कि.मी. वर ट्रायल रन सुरु करण्यात आला आहे. हे काम केवळ 27 महिन्यात पूर्ण झाले आहे. वर्धा रोड येथे मेट्रो रेल्वे व दळण-वळणासाठी डबलडेक्कर रोड तयार करण्यात येत असून जगातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी प्राधान्य दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जलदगतीने जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही या प्रकल्पाला महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार सुनील माथूर यांनी मानले.

No comments:

Post a Comment