नागपूर, दि. 4 : फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये होणाऱ्या इयत्ता 12वी व 10वी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन प्रक्रियेने भरण्याकरिता दिनांक 18 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
माध्यमिक व शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी http: //form17.mh-ssc.ac.in या तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इयत्ता 12 वी) च्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी अर्ज भरावा. नावनोंदणी भरलेल्या अर्जाची प्रत दिनांक 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावी.
शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो ऑनलाईन अर्ज भरताना स्कॅन करुन अपलोड करावा. तसेच मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अर्ज भरताना नमूद करणे पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्जाची प्रत विद्यार्थ्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येईल. संपूर्ण अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र विद्यार्थ्यांनी दोन प्रतीत द्यावे. अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करावी. इयत्ता 10 वी साठी 1000 रुपये नोंदणी शुल्क व 100 रुपये प्रक्रिया शुल्क असून इयत्ता 12 वीसाठी 500 रुपये नोंदणी शुल्क व 100 रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात आले आहे. विहित शुल्क रोखीने शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावे. तसेच अर्जासाठी दिलेल्या पावत्यांपैकी विद्यार्थ्यांसाठीच्या प्रतीवर स्वाक्षरी व शिक्का घेऊन स्वत:कडे ठेवावी.
दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असल्यास त्यांनी दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी.
माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज भरताना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत 020-25676405/ 25705271 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्यमंडळ सचिव कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment