Thursday, 5 October 2017

ताजबाग यात्रेकरुंसाठीच्या सुविधेची कामे तात्काळ पूर्ण करा -चंद्रशेखर बावनकुळे

·     
  मोबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
·         आरोग्य सुविधेकडे विशेष लक्ष

नागपूर, दि. 5 : ताजबाग येथील यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या सुविधांमध्ये मोबाईल टॉयलेट, पिण्याचे पाणी, आरोग्य, परिसर स्वच्छता व साफसफाईकडे प्राधान्याने लक्ष देत ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. ताजबाग परिसरातील कामाची त्यांनी पाहणी केली.  ऊर्स आयोजनाबाबतच्या बैठकी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
मोठा ताजबाग येथील सभागृहात आयोजित बैठकीदरम्यान आ. सुधाकर कोहळे, नागपूर सुधार प्रन्यासचे चेअरमन डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, अपर आयुक्त रविंद्र कुंभारे, ताजबाग ट्रस्टचे प्रशासक गुणवंत कुबडे, कार्यकारीणी समितीचे सदस्य सय्यद जिलानी, सहाय्यता समितीचे सदस्य अयान खान उपस्थित होते.
ताजबाग परिसरातील विकास कामे वेगाने सुरु असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून कडक बंदोबस्ताची कार्यवाही पोलिस विभागाकडून करण्यात येईल असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता या सुविधांना 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देतांना पालकमंत्री म्हणाले, विकास कामांसाठी व यात्रेच्या सुविधासाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी ताजबाग ट्रस्टने त्यांच्या अधिकारातील कामे जबाबदारीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
विकासकामे व यात्रेकरुंच्या आरोग्य सुविधांच्या कामाचे नियोजन करतांना संबंधित विभागांनी वेळेत कामे पूर्ण करावीत व सूचनांचे तंतोतंत  पालन करावे. तसेच परिसराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियानाच्या चमूची मदत घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी दिल्या.
विजेची समस्या लक्षात घेता ताजबाग परिसरातील व एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ऑटोमेशनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, ताजबाग ऊर्ससाठी महानगरपालिकेमार्फेत सर्वतोपरी मदत करण्यात येत असून उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  तसेच ताजबाग ट्रस्ट परिसर व ऊर्ससाठी कुठल्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास तत्परतेने पूर्ण करण्यात येईल.
दीक्षाभूमी येथील दसरा कार्यक्रमासाठी महानगरपालिकेने केलेल्या नियोजनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक करण्यात आले असून ताजबाग ऊर्ससाठी देण्यात येणाऱ्या सुविधांच्या नियोजनासाठी  प्रयत्नरत आहोत. असे सांगून पालकमंत्री बावनकुळे यांनी ताजबाग ट्रस्ट व विविध विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांना आढावा बैठकी दरम्यान सांगितले. यावेळी ताजबाग ट्रस्टचे प्रशासक गुणवंत कुबडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताजबाग दर्ग्यातील चादर भेट देऊन सत्कार केला.

*****

No comments:

Post a Comment