मुंबई, दि.१ : शास्त्रीय कला
क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच लोककला प्रकारात सहभाग नोंदविणाऱ्या
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील (इयत्ता १० वी) विद्यार्थ्यांना वाढीव गुण
देऊन प्रोत्साहन देण्याचा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. मार्च २०१८ मध्ये घेतल्या जाणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या
निकालात या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत.
शास्त्रीय कला तसेच
लोककला यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासनामार्फत वेगवेगळ्या योजना तसेच उपक्रम
हाती घेण्यात आले आहेत. शिवाय शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या
दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून
शास्त्रीय कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना वाढीव
गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नवीन
कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीच्या निकषानुसार शास्त्रीय
कलेचे शिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थांची निवड सांस्कृतिक कार्य विभागातर्फे
करण्यात आली आहे.
शास्त्रीय गायन, वादन व नृत्य या क्षेत्रात काम करणाऱ्या ४९ तसेच लोककलेच्या प्रकारातील ४७ संस्थांची निवड सांस्कृतिक विभागामार्फत
करण्यात आली आहे. या संस्थांच्या माध्यमातून शास्त्रीय कला गायन, वादन व नृत्य यांचे दर्जेदार प्रशिक्षण देऊन
विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याची संधी दिली जाणार आहे.
००००
No comments:
Post a Comment