लोकशाही दिनी 20 अर्जांवर कार्यवाही
मुंबई, दि. 4 :लॉटरी
पद्धतीचा अवलंब करुन ठाणे महापालिकेने दिव्यांग अर्जदारांना तात्काळ स्टॉल उपलब्ध
करुन द्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज दिले.
            मंत्रालयात आज झालेल्या
ऑनलाईन लोकशाही दिनी नागरिकांच्या विविध विभागांशी निगडित 20 तक्रारींवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तात्काळ
निर्णय घेतले. या दिनात ठाणे येथील 9 दिव्यांग अर्जदारांनी
दिव्यांगासाठीचे स्टॉल मिळावेत यासाठी अर्ज केले होते. याअनुषंगाने
मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. या 103 व्या लोकशाही
दिनामध्ये सामान्य प्रशासन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग
महसूल विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास
विभाग, जलसंपदा विभाग आदी विभागांशी संबंधित पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर 
या जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश होता.
            ठाणे येथील दिव्यांग
अर्जदारांचे स्टॉल मिळण्यासाठीचे अर्ज स्वीकारुन महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या
स्टॉलचा आढावा घ्यावा. त्यावर 1 महिन्याच्या आत माहिती
घेऊन लॉटरी पद्धतीने संबंधितांना स्टॉल उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी,
असे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले.
            माजी सैनिक असलेले
डहाणू (जि. पालघर) येथील रमेश विष्णू देशपांडे यांनी त्यांच्या शेतजमिनीवर
अनधिकृतरित्या घरकुल, बंधारा व रस्त्याचे
बांधकाम झाल्याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी
निर्देश दिले की, संबंधित अर्जदार हे माजी सैनिक असल्याने
सरकारी खर्चाने त्यांच्या जमिनीची मोजणी करावी. मोजणीनंतर घरकुलाच्या जागेची
संबंधित योजनेतून आजच्या शासकीय दराने पूर्णत: मोबदला द्यावा. तसेच बंधाऱ्याच्या
भरावाचाही मोबदला दिला जावा. रस्त्याची मोजणी करुन वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत
विस्तारीकरणाचे काम थांबविण्यात यावे. पुढील सर्व कार्यवाही जमिनीच्या मोजणीनंतरच
करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर श्री. देशपांडे यांनी
समाधान व्यक्त केले.
            आत्तापर्यंतच्या
लोकशाही दिनात 1424 तक्रारींपैकी 1418 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित 6 आणि
आजच्या लोकशाही दिनात स्वीकृत करण्यात आलेल्या 20 अशा26 तक्रारींवर आज निर्णय घेण्यात आला.
            या लोकशाही दिनास
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ,
मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पोलिस महासंचालक सतीश माथूर, महसूल विभागाचे प्रधान
सचिव  मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, जलसंधारण
विभागाचे सचिव एकनाथ डवले व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००
 


 
No comments:
Post a Comment