Monday, 4 December 2017

अनुभवविश्व समृद्ध करण्यामध्ये ग्रंथांचे योगदान मोलाचे -ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे

                            
सर्वप्रकारच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूसच
        नागपूर दि. 4 : आपले अनुभवविश्व व जाणीवा  समृद्ध करण्यामध्ये ग्रंथांचे योगदान मोलाचे असून सर्वप्रकारच्या साहित्याचा केंद्रबिंदू  माणूसच असतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती आशा बगे यांनी केले.
        वसंतराव देशपांडे सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने  नागपूर ग्रंथोत्सव- 2017 चे आयोजन करण्यात आले. यावेळी  प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीमती  वि. मु. डांगे, सहाय्यक ग्रंथालय संचालक मि. रा. कांबळे, जिल्हा ग्रंथपाल ग. मा. कुरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर तसेच मान्यवर उपस्थित होते.
            जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स येथून ग्रंथ दिंडी व ग्रंथपूजनाने नागपूर ग्रंथोत्सव 2017 ची सुरुवात झाली. ग्रंथदिंडीमध्ये जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विविध ग्रंथालयांचे पदाधिकारी,विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य मान्यवर सहभागी झाले.
            ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती आशा बगे म्हणाल्या, व्यक्त होण्यासाठी  भाषा खूप प्रभावी माध्यम असून भाषा समृद्धीसाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. साहित्यातून आपल्याला विभिन्न संस्कृती व जीवनाचे दर्शन होते. वाचन आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावते. ग्रंथ आपल्याला बाहेरच्या जगाशी जोडून देतात. ग्रंथांच्या प्रसारात संत वाङमयाचे योगदान मोलाचे आहे. आज ई-बुक्सही मोठ्या प्रमाणावर वाचली जात आहेत. अनुवादीत साहित्याचे प्रमाण अधिक वाढण्याची गरज असल्याचे श्रीमती बगे यांनी सांगितले.
            प्रा. रविंद्र शोभणे म्हणाले, ग्रंथ हे मानवी जीवनाचे दिशादर्शक व गुरु आहे. आपण आपल्या संस्कृतीशी ग्रंथानेच जोडलेले असतो. वाचन संस्कृतीत आजपर्यंत अनेक स्थित्यंतरे झाली, होत आहेत परंतु वाचनसंस्कृती टिकून राहिली आहे. ग्रंथोत्सवाला आता मोठे स्वरुप प्राप्त झाले असून वाचनसंस्कृती वाढीस लागण्यासाठी  ग्रंथोत्सवासारखे उपक्रम निश्चितच स्तूत्य असल्याचेही श्री. शोभणे यांनी सांगितले.
शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीमती  वि. मु. डांगे म्हणाल्या, ग्रंथनिर्मिती  विविध टप्प्यातून विकसित होत गेली. नवीन वाचक घडविण्यासाठी तसेच वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम नक्कीच उपयुक्त आहे. वाचनामुळे भाषा समृद्ध होण्यास  मदत होते, कल्पकता वाढते त्यामुळे विद्यार्थ्यांनी  क्रमिक पुस्तकांच्या वाचनाबरोबरच अवांतर वाचन वाढवावे, असे आवाहनही श्रीमती डांगे यांनी केले.
सहाय्यक ग्रंथालय संचालक मि. रा. कांबळे म्हणाल्या, वाचनातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी व ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. असेही श्रीमती कांबळे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथपाल ग. मा. कुरवाडे म्हणाले, वाचकांना विविध प्रकारचे ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत व वाचनसंस्कृती वाढीस लागावी यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत नागपूर ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. आपण एका महान व प्राचीन संस्कृतीचे पाईक असून यामध्ये विविध उत्सव साजरे करण्यात येतात. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असून विविध परंपरेतून याचे जतन करण्यात आले. सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी साहित्य मोलाची भूमिका बजावते. इंटरनेट व सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळून दर्जेदार साहित्य वाचण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही  श्री. कुरवाडे यांनी सांगितले.
            सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले.

****

ग्रंथदिंडी व ग्रंथपूजनाने ग्रंथोत्सवाला सुरुवात
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रंथपूजन
          जिल्हा ग्रंथालय संचालनालय तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाला. त्यानंतर जी एस कॉमर्स कॉलेज येथून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात लेझीम, ढोलताशा तसेच विविध विषयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. जीएस कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य एन.वाय. खंडाईत, शिक्षणाधिकारी एस.एन.पटवे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहायक ग्रंथालय संचालक श्रीमती मिरा कांबळे, विभागीय ग्रंथपाल श्रीमती व्ही.एम.डांगे आदींनी यावेळी ग्रंथपूजन केले.
          जी एस कॉमर्स कॉलेज ते डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहापर्यंत उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली.  या ग्रंथदिंडीमध्ये युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी ग्रंथदिंडीचे उद्घाटन करतांना वाचन चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या लेखकांचे पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन यावेळी केले.
          ग्रंथदिंडीच्या आयोजनामध्ये जी एस कॉमर्सचे प्राचार्यसह शिक्षक व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला होता. नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयाचे प्रतिनिधी, सोनबा नगर येथील न्यू स्टार पब्लीक स्कूल, लोकमान्य टिळक शाळा, भूपेंद्र हायस्कूल, शिव छत्रपती प्रतिष्ठानचे ढोलताशा पथक, नागपूरातील ग्रंथप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. स्वागत जिल्हा ग्रंथपाल जी.एम. कुरवाडे यांनी केले. 

No comments:

Post a Comment