·
चार
दिवसात सर्वेक्षण पूर्ण
·
20
हजार 318 बाधित शेतकऱ्यांचा समावेश
·
नुकसानीचा
अहवाल शासनाला सादर
·
गहू,
हरभरा, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदींचा समावेश
नागपूर, दि. 19 : गारपिट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा,
मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात
झालेल्या सर्वेक्षणनुसार 16 हजार 351.62 हेक्टर आर क्षेत्र बाधित झाले आहे.
यामध्ये 20 हजार 318 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाधित क्षेत्रामध्ये 33 टक्के
पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज
दिली.
गारपिट
व अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी, केळी आदी फळे तसेच गहू, हरभरा व भाजीपाला आदी
पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनातर्फे बाधित क्षेत्रातील नुकसानीचे सर्वेक्षण केवळ चार दिवसात पूर्ण करुन नुकसान झालेल्या संपूर्ण बाधित क्षेत्राचा
अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
जिल्हयात
वादळी पाऊस व गारपिटीमुळे दिनांक 11 ते 13 फेब्रुवारीदरम्यान शेती व फळ पिकांचे
नुकसान झाले होते. या नुकसानीसंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये
कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील गहू, हरभरा व
भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तर संत्रा, मोसंबी, केळी व इतर पिकांचे काटोल,
नरखेड, सावनेर, कळमेश्वर व पारशिवणी आदी तालुक्यातील नुकसानीचा समावेश आहे. बाधित
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईसाठी 24 कोटी 85 लक्ष रुपये निधी लागणार आहे.
गारपिटीमुळे
गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून 33 टक्केपेक्षा जास्त बाधित झालेल्या तालुक्यांमध्ये काटोल तालुक्यातील 6 हजार 88.31
हेक्टर शेत पिकांचा समावेश असून 7 हजार 347 बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश
आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 8 कोटी 21 लक्ष रुपयाचे अनुदान लागणार आहे. नरखेड
तालुक्यातील 2 हजार 197 हेक्टर आर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून बाधित 3
हजार 279 शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाईसाठी 2 कोटी 961 लक्ष रुपयाचा निधी
लागणार आहे. कळमेश्वर तालुक्यातील 1 हजार 83.50 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून
बाधितांमध्ये 1 हजार 336 शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाईसाठी 1 कोटी 461
लक्ष रुपये, सावनेर 297.30 हेक्टर आर 395 शेतकरी नुकसान 40 लाख, पारशिवणी 30
हेक्टर 53 शेतकरी, रामटेक 55 हेक्टर आर 130 शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.
संत्रा व मोसंबी फळांचे नुकसान
वादळी
पाऊस व गारपिटीमुळे पाच तालुक्यातील संत्रा, मोसंबी, केळी व इतर फळ पिकांचे मोठया
प्रमाणात 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक काटोल
तालुक्यातील 2 हजार 700 हेक्टर आर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसानीचा समावेश असून 3
हजार 67 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाईसाठी 4 कोटी 86 लक्ष रुपये लागणार
आहे.
नरखेड
तालुक्यातील 1 हजार 819 हेक्टर आर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले असून 2 हजार
417 बाधित शेतकरी आहेत. नुकसान भरपाईसाठी 3 कोटी 27 लाख रुपये. कळमेश्वर
तालुक्यातील 1 हजार 783 हेक्टर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान असून 1 हजार 909
शेतकरी बाधित आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्राकरिता 3 कोटी 20 लक्ष रुपये निधी लागणार
आहे.
सावनेर
तालुक्यातील 124 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले असून 133 शेतकऱ्यांचा
बाधितांमध्ये समावेश आहे. तसेच पारशिवनी तालुक्यातील 4 हेक्टर आर क्षेत्रामध्ये
नुकसान झाले असून 5 शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. गारपिटीमुळे व वादळी
पावसामुळे शेती व फळ पिकांचा 33 ते 50 टक्के व 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान
झालेल्या बाधित क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यात
आले आहे व त्यानुसार नुकसानीसंदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
कोरडवाहू
पिकाखालील बाधित क्षेत्रामध्ये एकुण 159.69, आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या बाधित
क्षेत्रामध्ये 9 हजार 751.11 हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकाखाली बाधित क्षेत्रामध्ये
6 हजार 430.82 हेक्टर आर अश्या एकुण 16 हजार 351.62 हेक्टर आर बाधित क्षेत्राचा
समावेश आहे.
******
No comments:
Post a Comment