Thursday, 15 February 2018

समाजाला दिशा देण्याचे काम संत साहित्य संमेलनातून -रामदास आठवले




                              ७ व्या अ.भा.संत साहित्य संमेलनाचे उदघाटन
    गोंदिया,दि.१५ : माणसे तुटली तर समाज उध्वस्त होतो हे ओळखून संतांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. संतांनी समतेचा विचार मांडला. समाज परिवर्तनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. संत साहित्य संमेलनातून समाजाला दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
      आज १५ फेब्रुवारी रोजी अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त वतीने आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून श्री.आठवले बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष पालकमंत्री राजकुमार बडोले, संमेलनाध्यक्ष हभप डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख्, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, बार्टीचे महासंचालक कैलाश कणसे, समता प्रतिष्ठानचे प्रादेशिक व्यवस्थापक सिध्दार्थ गायकवाड, माजी आमदार हेमंत पटले, लोकमत आयबीएनचे संपादक राजेंद्र गुंजे, उपेंद्र कोठेकर, विरेंद्र अंजनकर, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.सभापती शैलजा सोनवणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर,नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जि.प.सदस्य रचना गहाणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री.आठवले पुढे म्हणाले, समाजातील वाईट चालीरिती व जाती व्यवस्था नष्ट करण्याचे काम संतांनी केले. संतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याची आजही गरज आहे. कारण समाज पाहिजे तसा बदललेला नाही. संतांनी आपल्या विचारातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले पाहिजे. त्यामुळे तो आत्महत्या करणार नाही. विदर्भातील दुर्गम मागास भागात हे संत साहित्य संमेलन होत आहे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. माणसाला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून बनविण्याचे काम झाले पाहिजे. डॉ.आंबेडकरांनी त्यावेळी नदया जोड प्रकल्पाची भूमिका मांडली होती. शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढण्यासोबतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संतांनी प्रबोधन करण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे देशासाठी अमूल्य देणगी असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.जानकर म्हणाले, आज संतांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आपल्या प्रबोधनातून प्रोत्साहित करण्याचे काम करावे. विज्ञानाच्या पुढे जावून आता आध्यात्माकडे वळले पाहिजे. आध्यात्माकडे गेल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविता येतील. संतांच्या विचारांचे आचार-विचार प्रदान करुन त्यांच्या विचारानुसार पुढे कार्य करीत राहावे. असे संत साहित्य संमेलन खेडेगावात सुध्दा आयोजित करण्यात यावे असे सांगून ते पुढे म्हणाले, यावर्षी जिल्ह्याला गौशाळेच्या विकासासाठी १ कोटीचे अनुदान दिले जाईल. पुढे प्रत्येक तालुक्याला गौशाळेच्या विकासासाठी १ कोटी रुपये अनुदान देण्यात येईल. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असल्यामुळे जिल्हा मत्स्य हब म्हणून विकसीत करणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मत्स्यशेतीला चालना दयावी असे त्यांनी सांगितले.  
      श्री.देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संतांनी आता त्यांचे प्रबोधन केले पाहिजे. देशाचा अन्नदाता जर संकटात सापडला असेल तर जगच संकटात येईल असे होवू नये म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे संतांनी उभे राहावे. देश स्वतंत्र होवून ७५ वर्ष झाली तरी शेतकरी अडचणीतच आहे. शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून विकास झाला पाहिजे. बि-बियाणे व खतातून शेतकऱ्यांची फसवणून होवू नये, पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे गरजेचे आहे. सहकार समृध्द झाल्याशिवाय महाराष्ट्र समृध्द होणार नाही. राजकारणात काम करीत असतांना अध्यात्माची जोड आवश्यक आहे तरच यश प्राप्त होते असे त्यांनी सांगितले.
      श्री.बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या वाणीतून समाज घडविण्याचे काम वारकरी मंडळी करीत आहे. राज्याला घडविण्याचे काम संतांनी प्रभावीपणे केले आहे. समाजाला संस्कारीत करण्याचे काम वारकरी मंडळी करीत आहे. सामाजिक न्याय विभागाने सर्व समाजाला न्याय देण्याची चळवळ सुरु केली आहे. सन २००५ ते २०१५ पर्यंत राज्यातील ५ लाख शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वीज नव्हती. मागील तीन वर्षात ५ लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
      श्री.कांबळे म्हणाले, महाराष्ट्र ही साधूसंत, किर्तनकार, प्रबोधनकारांची भूमी आहे. महाराष्ट्राने अनेक वर्ष साधूसंतांच्या मार्गदर्शनाखाली समाजसुधारणा करण्याचे काम केले आहे. सामाजिक न्याय विभागाने मागील तीन वर्षापासून अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. समाज हा एकसंघ झाला पाहिजे ही संतांची भूमिका होती. शेतकऱ्यांच्या पाठीशी संतांनी भक्कमपणै उभे राहावे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ येणार नाही असे त्यांनी सांगितले.
     स्वागताध्यक्ष म्हणून श्री.बडोले म्हणाले, अनेक संत पुरुषांनी महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला आहे. त्यांच्या शिकवणूकीमुळेच संपूर्ण समाज गुण्यागोविंदाने एकत्र नांदतो आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ आहे. आपली प्रबोधनाची परंपरा प्राचिन आहे. या परंपरेमुळेच ही भूमी पवित्र झाली आहे. आजही पालावर राहणारा भटक्या समाजातील माणूस हा वंचित आहे. तो विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. समाजातील विसंगती संतपुरुषांनी मांडली. संतपुरुषांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होण्याची गरज आहे. सातव्या शतकापासून ते आजपर्यंतची संतांची शिकवण ही माणसाला माणूस म्हणून वागविणारी आहे. संत साहित्यातून समाजाला दिशा देण्यासाठी हे संमेलन उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
     संमेलनाध्यक्ष हभप रामकृष्ण महाराज लहवितकर म्हणाले, महाराष्ट्राची जडणघडण संतांच्या विचारातून झाली आहे. राष्ट्रधर्म हा महत्वाचा आहे. संतांमुळे देशात सुख समृध्दी आणि शांती निर्माण झाली आहे. बुवाबाजी व अंधश्रध्देला वारकरी संप्रदायामध्ये थारा नाही. सदाचाराचा मुळ स्त्रोत हा वारकरी आहे. वारकरी पंथामध्ये जातीधर्माचा विचार नाही. वारकरी संतांच्या विचाराची आज गरज आहे. तो विचार विविध पैलूतून दिसून आला पाहिजे. समृध्दीपेक्षा संस्कार हे महत्वाचे आहे. धर्मनीती व राजनीती एकत्र चालली तर अभ्यूदय निश्चित आहे. सामाजिक न्यायाचा विचार व वारकरी पंथाचा विचार एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
      उदघाटनाच्या प्रारंभी या भारतात बंधूभाव नित्य वसू दे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते विणा आणि ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचेकडून हभप रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी संमेलनाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारली. यावेळी हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे, हभप चैतन्य महाराज कबीरबुवा, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, हभप बाबा महाराज राशनकर, हभप चैतन्य महाराज देहूकर यांचा मान्यवरांच्या हस्ते पंढरपूरचे प्रतिक घोंगडी, वारकरी फेटा व तुळशीचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.दिलीप काकडे व बार्टीचे समता दूत सचिन फुलझेले यांनी संयुक्तपणे केले. उपस्थितांचे आभार नरहरी बुवा महाराज यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
०००००

No comments:

Post a Comment