Saturday, 17 February 2018

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुटीबोरी येथे पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण



नागपूर, दि. 17 :  राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत बुटीबोरी येथील पाणीपुरवठा योजनेचे व जलशुध्दीकरण केंद्राचे लोकार्पण अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
बुटीबोरी ग्रामपंचायतीस नागरी सुविधांसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामधील विविध विकासकामांचे भूमिपूजनही यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. 
आमदार समीर मेघे, आमदार डॉ.पंकज भोयर, सरपंच वंदना ठाकरे, उपसरपंच अनिस बावला, बबलू गौतम, आकाश वानखेडे, शकुंतला वरखेडे, देवराव डोईफोडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत बुटीबोरी येथे पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली. ही ग्रामस्थांसाठी निश्चितच समाधानाची बाब आहे. जिल्ह्याच्या विकासात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यानुसार विविध गावात पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. बुटीबोरी येथील पाणी वितरण प्रणालीसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कामासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. बुटीबोरी नगरपरिषद निर्माण करण्यासाठीही पावले उचलली जात आहेत.
विदर्भाचा विकास झपाट्याने होत असून जलसंधारणाच्या अनेक योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. बुटीबोरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही श्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
आमदार समीर मेघे म्हणाले, बुटीबोरी येथील रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण होत आहे. गावात अनेक विकासकामे होत आहेत. लवकरच फ्लायओव्हरचे कामही सुरू होणार आहे. फेज 2 मध्ये बुटीबोरीपर्यंत मेट्रो धावणार असल्याचेही श्री मेघे यांनी सांगितले. 
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत बुटीबोरी येथे 8.06 कोटी निधीतून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून जलशुध्दीकरण केंद्रही बांधण्यात आले आहे.
****

No comments:

Post a Comment