Sunday, 18 February 2018

प्रल्हादच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन- पालकमंत्री



एकही नुकसानग्रस्त शेतकरी सर्वेक्षणातून सोडू नका 

नागपूर, दि. 18 :   काटोल तालुक्यातील ईसापूर खुर्द येथील शेतकरी प्रल्हाद मधुकर धोटे यांनी 17 फेब्रुवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर आज सकाळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ईसापूर येथील त्यांच्या घरी जाऊन प्रल्हाद धोटे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबियांना दिले.
            गेल्या 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीने प्रल्हादच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले. पालकमंत्र्यांसोबत आज काटोलचे आ. डॉ. आशिष देशमुख, जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, किशोर रेवतकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. गारपिटीने शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असून या गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे गारपिटीने चांगलेच नुकसान झाले आहे. याप्रसंगी पालकमंत्र्यांकडे गावातील सर्व शेतकऱ्यांनी योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी जोरदार मागणी केली.
            गारपिटीसंदर्भात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी महसूल प्रशासनाला तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देत गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी सर्वेक्षणातून सुटता कामा नये, असे सांगितले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे अशी शासनाची भूमिका असून शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी याप्रसंगी तक्रार करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना दिले.
00000









No comments:

Post a Comment