Monday, 19 March 2018

अहमदनगरमधील ट्रस्टच्या जमिन विक्रीसंदर्भात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी - चंद्रकांत पाटील


मुंबई, दि.19:अहमदनगर जिल्ह्यातील लक्ष्मीनारायण देव विष्णु मंदिर संस्थानच्या जमिनीची विक्री करताना धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली असून, नियमानुसार विक्री करण्यात आली आहे. भविष्यात संस्थानच्या जमिनी विक्री संदर्भात धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली असतानाही जिल्हाधिका-यांचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधकारक करण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्यात येईल. तसेच संबंधित प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल असे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य विजय औटी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
श्री. पाटील म्हणाले, पारनेर येथील जमीन विक्रीसंदर्भात धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली होती. कायदेशीर लिलाव करून ही जमीन नियमाप्रमाणे शेतकरी असलेल्या व्यक्तीस विकण्यात आली होती.  धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाची चिकीत्सा करता येत नाही. त्यासंदर्भात न्यायालयासमोर खटला दाखल करावा लागतो. संबंधित जमिनीच्या विक्री खरेदीसंदर्भात जो घटनाक्रम घडला त्यासंदर्भात फेरफार नोंदणी थांबवून विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश देऊ असेही श्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात यांनी भाग घेतला.
००००

No comments:

Post a Comment