Thursday 26 April 2018

राहूल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका! महाराष्ट्र तुमच्या पाठीशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




मुंबई, दि. 26 : राहुल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका. त्यासाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल, संपूर्णमहाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या राहूल आवारे यांना आज येथे गौरविले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रमुख उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियामध्ये गोल्डकोस्ट येथे नुकताच पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहूल आवारे यांनी ५७ किलो वजनी गटात फ्रि-स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मल्ल राहूल यांचे कौतुक केले. ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हे यश अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर क्रीडास्पर्धांत पदक पटकाविणाऱ्या क्रीडापटूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीचा निर्णय यापुर्वीच आम्ही घेतला आहे. त्यामुळे आता राहूल यांनी २०२०मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीला लागावे आणि ऑलिंपिकचे मैदानही जिंकावे. या स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल.
यावेळी मल्ल राहूल यांनीही कुस्तीमधील यापुढेही चमकदार कामगिरी व्हावी यासाठी मेहनत घेईन, एवढ्यावरच थांबणार नाही, असे आश्वस्त केले.
यावेळी राहूल यांचे प्रशिक्षक अर्जून पुरस्कार विजेते मल्ल काका पवार, दिलीप भरणे, दत्ता गायकवाड, गोविंद पवार आदी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment