Thursday 26 April 2018

विधानपरिषद निवडणूक - प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी आवाहन


            मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2018 जाहीर झाली असून मतदान 21 मे, 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 24 मे, 2018 रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाचे विहित प्राधिकार पत्र मिळविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकार मतदार संघ, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघ, परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघ, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघात निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाचे विहित प्राधिकार पत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. ही प्राधिकार पत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषाची पूर्तता करणाऱ्या उच्छूक प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधिंच्या नावाच्या शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे पोहोचविण्याचा अंतिम दिनांक 6 मे, 2018 आहे. या शिफारशी महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांनी 5 मे, 2018 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई यांच्याकडे सादर करावयाची आहेत.
            प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधिंना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या या निवडणूकीकरीता प्राधिकार पत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या दोन प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकार पत्रे हवी असल्यास तीन प्रतीसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे 5 मे, 2018 पर्यंत पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 5 मे, 2018 नंतर या कार्यालयास प्राप्त झालेली प्राधिकार पत्राची मागणी स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारीयांनी कळविले आहे.
००००

No comments:

Post a Comment