v लाँगमार्च
प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अमृत महोत्सवी सत्कार
v आंबेडकरी
चळवळीला वाहून घेतलेल्या निस्पृह व्यक्तिमत्वाचा गौरव
नागपूर, दि. 5 : लाँगमार्चचे प्रणेते
प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील शेवटच्या
घटकापर्यंत पोहचवत असतांना स्वत:च्या तत्वांशी व विचारांशी कधीही तडजोड केली नाही.
सर्व जातीधर्मांच्या व्यक्तीसोबत सलोखा निर्माण करतांनाच कुठेही कटुता निर्माण होऊ
न देण्याच्या त्यांच्या गुणामुळे ते अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे ठरले असल्याचे
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
डॉ. वसंतराव
देशपांडे सभागृह येथे आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश गजभिये, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार
शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, प्रा. इ.मु. नारनवरे,
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग सदस्या सुलेखा कुंभारे, गिरीष गांधी, अटल बहादुर
सिंग, रंजनाताई कवाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध
संस्था व संघटनातर्फे आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे सरांचे व्यक्तिमत्व उत्साही,
कार्यात झोकून देणारे असे बहुरंगी स्वरुपाचे आहे. प्रा. कवाडे सर विविध विषय
आक्रमकतेने परंतु संयमाने मांडतात. लाँगमार्चच्या रुपाने त्यांनी चळवळीला व
तरुणाईला दिशा दिली. वंचितांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठीच त्यांनी कार्य केले.
सरांनी तत्वांशी कधीही तडजोड न करता सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले.
विविध क्षेत्रात काम करतांना कवाडे सरांनी माणसे जोडली. परस्परांबाबत आदरभाव जपला.
अमृत महोत्सवानिमित्त होणारा हा सत्कार वास्तविक पाहता संघर्षाचाच सत्कार असल्याचे
गौरद्वोगार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काढले.
माजी केंद्रीय
मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी त्यांच्या
जीवनाची जडणघडण अतिशय कष्टातून साकारली. आंबेडकरी चळवळीला सरांनी वाहून घेतले.
संसदही गाजवली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक, आर्थिक व समतेचा संदेश सरांनी
वारंवार मांडला. प्रा. कवाडे सरांचे व्यक्तीमत्व आग्रही आहे. तसेच सर्वांना बरोबर
घेऊन जाणारेही आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या आर्थिक व सामाजिक विचारांचा पगडा असलेला प्रा.जोगेंद्र कवाडे
यांनी शिका व संघटीत व्हा हा विचार समाजामध्ये रुजविला. अमृत महोत्सवाला विशेष
करुन उपस्थित असल्याचे सांगतांना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सर्वंकष दलित
चळवळीची भूमिका मांडतांना समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन ही चळवळ पुढे नेण्याची
आवश्यकता आहे. आंतरजातीय विवाह व्हावेत या विचारांची भूमिका स्वीकारतांना पुढच्या
पिढीलाही या सर्वंकष विचाराने पुढे नेण्याचे कार्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी
केले असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी त्यांनी केला.
प्रास्ताविकात
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, प्रा.कवाडे सरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांनी मांडलेल्या अर्थशास्त्रीय विचारांचा सखोल अभ्यास केला. अन्यायाविरुद्ध तसेच विविध प्रश्नांवर लाँगमार्चच्या रुपाने
लढे उभे केले. विविध संपादकीयातूनही सरांनी वैचारीक लेखन केल्याचे डॉ.राऊत यांनी
सांगितले.
अटल बहादुर
सिंग म्हणाले, प्रा.कवाडे यांनी आयुष्याच्या वाटचालीत माणसे जोडली. विद्यार्थी
चळवळीतील तसेच विविध क्षेत्रातील सरांचे कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे. यावेळी
माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
सत्काराला
उत्तर देतांना आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी
राज्य घटनेच्या रुपाने सर्वधर्मसमभावाची संकल्पना मांडली. समता, बंधुता व
स्वातंत्र्य ही मूल्ये राज्यघटनेने दिली. सामाजिक
परिवर्तन व अस्मिता टिकविण्यासाठीच आजपर्यंत लढा दिला. आपण समाज व चळवळीला
काय दिले याचा विचार करणे गरजेचे आहे. हिंमत, चिकाटी व धैर्य कार्यकर्त्यांनी
जपावे. सर्वांना बरोबर घेऊन चालावे. तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या शिकवणीवरच वाटचाल सुरु असून यापुढेही वंचित आणि उपेक्षितांसाठी काम करीत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वप्नातील देश घडवायचा असल्याचे प्रा.कवाडे यांनी
सांगितले.
*****
प्राध्यापक जोगेंद्र कवाडे. एक ज्वालाग्राही व्यक्तित्व म्हणून पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विश्वविद्यालय नागपूर येथील अनेक कार्यक्रमात सरांना ऐकण्याची जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी सर नवीन दिसले. प्रत्येक वेळी नवीन विषय सरांनी सक्षमपणे पेलावा व आम्ही त्यांचे प्रशंसक व्हावे हा आमचा अनुभव. एकदा अरुण निनावे व ढोबळे, एक कुलगुरू तर दुसरे रजिस्ट्रार परंतु दोघेही चूप! झापणे कसे असावे ते सरांनी दाखवल्याचे आमचे डोळे आम्हाला आजही आठवण करून देतात.
ReplyDeleteविद्यार्थ्यांमध्ये प्रभावी व लाडके असे कवाडे. मराठीत कवाडं म्हणजे दारं. हे तर कवाडे, अनेक इमारतींचे दारे! अनेक अनेक दालनांना उघडून देणारे कवाडे! माणूस, नेता, वक्ता, सौजन्य, आक्रमकता, मैत्री, प्रभाव आदी आदी अनेक शब्दांना एकाच शब्दाने इंगित करावे तेव्हा उपयोगात येणारा शब्द म्हणजे सर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे. नामांतर आंदोलनाचे क्रेडिट कोणीही घेवोत परंतु आंदोलन उभे करून जिवंत ठेवणारे एकमेव आंदोलक म्हणजे सर जोगेंद्र कवाडे हे आम्ही पहिले आहे.
अमृत महोत्सवी वर्षात सर शतायुषी व्हावे ही आमची इच्छा. परंतु शतायुषी वर्षात आपण पुन्हा एकदा अमृत वर्ष साजरे करू असे आपणाला भेटून आपणाला सांगणे ही आमची इच्छा. अनेक वर्ष झालेत सरांना भेटता आले नाही. अगदी नागपूर महानगर पालिका व नागपूर सोडल्यापासून. आफ्रिकेत जाण्याअगोदर एकदा घरी जाऊन आलो परंतु सरांचे घरी नसणे भेट न होण्यासाठी निमित्त्य ठरले!
प्रतिक्षरात!
डॉ. बळवंत मेश्राम, हल्ली मुक्कम पोस्ट: उदयपूर, राजस्थान