Saturday, 5 May 2018

जिद्द व सचोटीच्या जोरावर मराठी महिला उद्योजकांची गगणभरारी महाराष्ट्र महोत्सवातील परिसंवादाचा सूर



नवी दिल्ली, 5 :‍ उद्योग उभारण्याचे स्वप्न उराशी घेऊन भांडवल उभारणे, ‍विविध प्रकारचे उत्तमोत्तम नियोजन,सोबतीला जिद्द व सचोटी या जोरावर मराठी  महिला उद्योजकांनी खाद्य, आरोग्य, शिक्षण ‍व औषध आदी उद्योग क्षेत्रात विविध अडचणींवर मात करत घेतलेल्या गगणभरारीचा अनुभव आज दिल्लीकरांनी महाराष्ट्र महोत्सवात  घेतला.
  येथील कस्तुरबा गांधी ‍मार्ग  स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमीत्त पुढचे पाऊलसंस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुस-या सत्रात मराठी महिला उद्योजक-अडचणींवरील मातया विषयावर  परिसंवाद झाला. बंगळुरू येथील पूर्णब्रह्म फूड्सच्या व्यवस्थापकीय संचालक जयंती कठाळे, वात्सल्य फाँडेशनच्या स्वाती बेडेकर, महिको या बियाणे कंपनीच्या संचालक डॉ उषा बारवाले आणि शिक्षणक्षेत्रात स्कूल डिझाईन संकल्पना राबविणाऱ्या दिल्ली येथिल उद्योजिका निवेदिता पांडे  यांनी  या परिसंवादात सहभाग घेतला.
मराठी जेवणाला खास ओळख ‍निर्माण करुन देत महिला उद्योजिका म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटविणा-या पूर्णब्रह्म फुडच्या जयंती कठाळे यांनी १८ लाखांच्या गुंतवणूकीतून सुरु केलेला उद्योग आज नावारुपाला आला आहे. सुरुवातीलाच भांडवल उभारण्यासाठी आलेली अडचण व त्यावर जिद्द व चिकाटी ने केलेली  मात हे त्यांच्या यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. वरण-भात, तूप, साबुदाणा खिचडी,  पुरणपोळी  अशा खास मराठी व्यंजनांना खवय्यांपर्यंत पोहचविण्याचा निर्धार करुन श्रीमती कठाळे यांनी पूर्णब्रह्म ची स्थापना केली.  आज पूर्णब्रह्मची देशात एकूण १४ केंद्र आहेत. प्रत्येक केंद्राची आर्थिक उलाढाल वर्षाकाठी सरासरी ८ कोटी ऐवढी आहे.
 महिलांमध्येआरोग्य विषयक जागृती करत सॅनेटरी पॅड निर्मीतीसाठी महिलांना एकजुट करणा-या वडोदरा येथील वात्सल्य फाऊंडेशनच्या प्रमुख स्वाती  बेडेकर यांनी  आरोग्य क्षेत्रात  मोलाचे काम केले. सॅनेटरी पॅड वापरासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन महिलांमध्ये  जागृती  निर्माण करणे व पुढे विविध  महिलांना सॅनेटरी पॅड निर्मीती क्षेत्रात सामावून घेणा-या श्रीमती बेडेकर यांना या क्षेत्रात  ब-याच अडचणी आल्या. ऑरगॅनिक वस्तुंचा वापर करून अशुध्दीनाशक तंत्र    विकसीत करत त्यांनी  सॅनेटरी पॅड तयार केल्या. जागो-जागी सखी केंद्रतयार केले या केंद्रांच्या माध्यमातून पॅडची निर्मिती व वितरणाचे कार्य महिलाच करतात. वात्सल्य फाऊंडेशनच्या माध्यमातून ‍ महिलांच्या आरोग्याची काळजी व महिलांना ‍रोजगार निर्मिती उपलब्ध झाली आहे.  ही संस्था देश-विदेशात सॅनेटरी पॅड निर्मीतीसाठी अशुध्दीनाशक तंत्राचे खास  प्रशिक्षण देत  ‍समाजऋण फेडण्याचे कार्यही समर्थपणे करीत आहे.
दिल्लीत स्थायीक झालेल्या उद्योजीका    एन प्लस युसंस्थेच्या  निवेदिता पांडे यांनी  शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सुसंवाद स्थापीत करण्यासाठी  त्यांनी  विशेष कार्यक्रम आखला . स्थापत्य कलेचा सुयोग्य वापर करत  शाळांमध्ये  आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी  त्यांची संस्था कार्यरत आहे.  आजपर्यंत त्यांनी देशभर 70 शाळांमध्ये ही संकल्पना पोहचविली आहे. या क्षेत्रात आलेल्या अडचणींवर अनुभव, जिदद व सचोटीमुळेच मात  करु शकले अशा भावना श्रीमती पांडे यांनी व्यक्त केल्या. ‍
 महिको या  बियाणे या क्षेत्रातील नामांकित  कंपनीच्या संचालक डॉ उषा बारवाले यांनी शेतक-यांना उत्तमोत्तम बी -बियाणे उपलब्ध करुन देत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.या उद्योगासमोर आलेल्या अडचणी व केवळ शेतक-यांचे कल्याण या एकाच ध्येयाने अडचणींवर केलेली मात या विषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन अश्‍विनी अडीवडेकर यांनी तर आभार प्रदर्शन रेणु आघाव यांनी केले.


No comments:

Post a Comment