Wednesday 27 June 2018

सुलवाडे जामफळ उपसा सिंचन प्रकल्पास सुधारित मान्यता

धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ (कनोली) उपसा सिंचन योजनेस (ता. शिंदखेडा) अटींच्या अधीन राहून 2407 कोटी 67 लाख रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 33 हजार 367 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अवर्षणप्रवण भागात कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी 1999 मध्ये सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 788.89 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 48 गावातील 26 हजार 907 हेक्टर तर धुळे तालुक्यातील 23 गावातील 6 हजार 460 हेक्टर असे एकूण 33 हजार 367 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. योजनेकरिता शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळ तापी नदीतून अस्तित्वातील सुलवाडे बॅरेजच्या वरच्या (U/S) भागातून उपसा करण्यात येणार आहे. प्रकल्पाची आवश्यकता आणि त्या माध्यमातून शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी शासनाने व्यय अग्रक्रम समितीच्या मान्यतेने 2 नोव्हेंबर 2017 ला सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस 2407.67 कोटी रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता काही अटींच्या अधीन राहून दिली होती. या योजनेस केंद्रीय जलआयोग आणि वन व पर्यावरण विभागाची मान्यता प्राप्त झाली आहे. यातील काही अडचणीच्या अटी वगळून आज प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
------०------

No comments:

Post a Comment