Wednesday 27 June 2018

उद्योगांसाठी शेतजमीन खरेदी प्रक्रियेच्या सुलभीकरणासाठी अधिनियमात सुधारणा

खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी शेतजमीन खरेदीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या होत्या. या तरतुदींच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कुळवहिवाट व शेतजमिनीसंदर्भातील अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी खरेदी केलेल्या वर्ग-2 धारणाधिकाराच्या शेतजमिनींच्या बाबतीत खरेदीदाराने विहित मुदतीत अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना खरेदीची रक्कम, ती कोणत्या स्वरुपात आणि कोणत्या लेखाशीर्षाखाली जमा करावी याबाबत कळविणे आवश्यक असते. या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कालावधीची गणना खरेदीदाराने केलेल्या अर्जानंतरच्या 30 दिवसांमध्ये करावी किंवा वेगळी करावी याबाबत स्पष्टता नव्हती. आजच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयास यासाठी लागणाऱ्या कालावधीची गणना अर्जानंतरच्या कालावधीत समाविष्ट करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. तसेच अर्जदारास नजराणा रक्कम भरण्यासाठी पूर्वी असलेला 30 दिवसांचा कालावधी आता 90 दिवस करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
            या निर्णयानुसार महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम 63-एक-अ, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियमाच्या कलम-89-अ आणि हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम-1950 च्या कलम 47 अ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक आगामी अधिवेशनामध्ये विधिमंडळात मांडण्यात येणार आहे.
-----000-----

No comments:

Post a Comment