नागपूर, दि. 4 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच विदर्भातील मासेमार बांधवांचेही जीवनमान उंचावण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालातील शिफारशी विकासाला गती देण्यास उपयुक्त ठरणार आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विविध अहवालांचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तसेच काही अहवाल त्यांना सादर करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, भंडारा जिल्हाधिकारी शंतनु गोयल, रोहयोचे आयुक्त ए.एस.आर. नायक यांच्यासह विदर्भ विकास मंडळाच्या तज्ञ सदस्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विदर्भातील झुडपी जंगल जमीनीबाबतचा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे. झुडपी जंगलाबाबत केंद्र सरकारने अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत, त्या अनुषंगाने राज्याने आपली निर्णय प्रक्रीया सुलभ करणे आवश्यक आहे, या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका परस्पर सुसंगत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते संत्रा फळ पिकाकरीता तयार करण्यात आलेल्या अहवालाचे विमोचन करण्यात आले. हा अहवाल विदर्भ विकास मंडळातर्फे राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्राने तयार केला.
विदर्भ विकास मंडळ व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यातर्फे तयार करण्यात आलेल्या विदर्भातील मत्स्य व्यवसाय व मत्स्य संवर्धन विकासाकरीता कृती आराखडा अहवाल, इंडियन इंस्टीटयुट ऑफ मॅनजमेंट, नागपूर यांनी देखील मत्स्य व्यवसायाच्या वाढीकरीता तयार केलेला अहवाल, महाराष्ट्र सुक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांच्या विनातरण कर्ज वाटप चौकशी अहवाल, आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावयाच्या आर्थिक व बिगर आर्थिक सवलती यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींचा अहवाल आणि पूर्व विदर्भातील विविध विकास प्रकल्पांकरीता अडसर ठरलेल्या झुडपी जंगलाबाबतच्या प्रश्नांबाबत राज्य शासनाने नेमलेल्या विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात आला. यावेळी उपायुक्त सर्वश्री सुधाकर तेलंग, बकुल घाटे, के.एन. के. राव, संजय धिवरे आदी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment