Wednesday, 29 August 2018

1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर कालावधीत नवीन मतदारांनी नाव नोंदणी करावी - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे




मुंबई, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्या नवीन मतदारांना  1 जानेवारी 2019  रोजी वयाचे 18 वर्ष पूर्ण होतात अशा मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी त्यांच्या दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध - शनिवार, दि. 1 सप्टेंबर 2018; दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी - शनिवार, दि. 1 सप्टेंबर ते बुधवार, दि. 31 ऑक्टोबर 2018; दावे व हरकती निकालात काढणे : शुक्रवार, दि. 30 नाव्हेंबर 2018 पूर्वी; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - शुक्रवार, दि. 4 जानेवारी 2019.
            दि. 1 जानेवारी 2019 रोजी ज्या भारतीय नागरिकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2001 वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवाशी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील.
  दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाही अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज दि. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) (ERO)यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, अन्यत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
            मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे तसेच मतदार यादी संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी ‘1950’ या टोल फ्री क्रमांकावर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            अधिक माहितीसाठी www.eci.nic.in किंवा www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. उपरोक्त सर्व माहिती दि. 1 सप्टेंबर 2018 पासून संकेतस्थळावर उपलब्ध राहील, अशी माहितीही श्री. जोंधळे यांनी यावेळी दिली.
००००

No comments:

Post a Comment