Friday 31 August 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज आमंत्रित

नागपूर, दि. 31 : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरु करण्यात आल्या असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये नवीन विहीरी खोदण्यासाठी 2.50 लक्ष रुपये, विद्युत पंप बसविण्यासाठी 20 हजार रुपये, विज जोडणीकरिता 10 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार, इनवेल बोअरिंग 20 हजार, शेततळ्यात प्लास्टिक अस्तिरीकरणासाठी 1 लक्ष रुपये, ठिंबक सिचन संचाकरिता 50 हजार व तुषार सिंचनाकरिता 25 हजार रुपये अनुदान प्राप्त होईल.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेद्वारे अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना परसबाग 500 रुपये, पीव्हीसी पाईपाकरिता 30 हजार मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये समाविष्ट बाबींचा देखील शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व अनुसूचित जमातीचे शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्यांचे जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीकरिता जाती वैधता प्रमाणपत्र, सातबारा, 8 अ नकाशा, लाभधारकाचे स्वत:चे आधार कार्डशी जोडलेल्या बॅंक खात्याची माहिती, दारिद्य रेषेखालील किंवा 1 लक्ष 50 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेला शेतकरी योजनेकरिता अर्ज सादर करु शकतो. शेतकऱ्यांनी www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती कामठी या कार्यालयास प्रत्यक्ष दिनांक, 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकता, अशी माहिती कामठीचे पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****

No comments:

Post a Comment