Friday 31 August 2018

जलयुक्त शिवार अभियानामुळे पिकांना मिळाले शाश्वत सिंचन - अश्विन मुदगल

    * तीन वर्षात 718 गावांमध्ये जलयुक्तची कामे
    * यावर्षी 3 हजार 121 कामांवर 93.23 कोटीचा निधी

नागपूर, दि. 31 :  जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे पावसाचा प्रदीर्घ खंड पडूनही शेतातील पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे शेतकऱ्यांना सुलभ झाले आहे. जलयुक्त शिवार अभियान हे पिकांसाठी संजीवनी ठरत आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षात 718 गावांमध्ये विविध स्वरुपाची कामे घेण्यात आली असून यावर्षी 170 गावांमध्ये 3 हजार 121 कामांचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पिकांसाठी आवश्यकतेनुसार शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार उपयुक्त ठरत असल्यामुळे लोकसहभागातूनही या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात झाली आहे. जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी योजनेत सन 2017-18 मध्ये जिल्ह्यातील 220 गावांचा समावेश करण्यात आला. या गावांमध्ये कृषी, वन, बफर झोन, जलसंधारण, जिल्हा परिषद लघु सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्व्हेक्षण, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत 3 हजार 511 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. विविध कामांकरिता 94 कोटी 17 लक्ष 8 हजार निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यत 3 हजार 319 कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानाचे गेल्या तीन वर्षाचे फलित पाहता यावर्षी देखील जिल्ह्यातील 170 गावांचा समावेश करण्यात आला आहे. सन 2018-19 च्या जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा मंजूर करण्यात आला असून यात 3 हजार 121 कामांचा समावेश करण्यात आला आहे. सदर कामांवर प्रशासनाच्या वतीने विविध योजनांमार्फत 93 कोटी 23 लक्ष 67 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मंजूर आराखड्यानुसार कृषी विभागामार्फत 1 हजार 280 कामांवर 32 कोटी 14 लक्ष, वन विभागाच्या 306 कामांवर 6 कोटी 15 लक्ष, बफर झोन मधील 53 कामांवर 76 लक्ष, जलसंधारणाच्या 48 कामावर 13 कोटी 18 लक्ष, जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या 285 कामांवर सर्वाधिक 38 कोटी  36 लक्ष, भूजल सर्व्हेक्षणाच्या 305 कामांवर 2 कोटी 31 लक्ष तर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत 844 कामांवर 30 कोटी 71 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.



तीन वर्षात 718 गावांचा समावेश
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, राज्याच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात सन 2015-16 पासुन करण्यात आली. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील एकूण 718 गावांचा अभियानांत समावेश करून विविध विभागांमार्फत 11 हजार 406 कामे पूर्ण करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात विशेष करुन शेतकऱ्यासाठी जलसाठा निर्माण करण्यात प्रशासन यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मागेल त्याला शेततळे योजनेत 3 हजार 343 पात्र
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 4 हजार 151 लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. प्रशासनाच्या वतीने 3 हजार 500 शेततळे वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याने प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानुसार 3 हजार 343 पात्र लाभार्थ्यांच्या अर्जास मंजुरी देण्यात आली आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये सध्या 1 हजार 816 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
*****

No comments:

Post a Comment