Monday, 3 September 2018

विकास कामांसाठी प्राप्त निधी 30 डिसेंबर पूर्वी खर्च करा - चंद्रशेखर बावनकुळे

Add caption
जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा अंमलबजावणीचा आढावा
अखर्चित निधी तात्काळ खर्च करा
प्रत्येक फाईलवर 24 तासात निर्णय घ्या
759 शाळा सोलरवर आणण्यासाठी 11 कोटी रुपये
दिव्यांगांसाठी रोजगाराची योजना राबवा 
नागपूर, दि.3 :  जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा नियोजन मंडळ तसेच शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेला निधी योजनानिहाय कालबध्दपणे खर्चाचे नियोजन करतानाच संपूर्ण विकास निधी 30 डिसेंबरपूर्वी खर्च करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. कामांची गती वाढवून सामान्य जनतेपर्यंत विकास कामे पोहचवा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीण भागात रस्ते, पाणी, सिंचन, शिक्षण तसेच सामुहीक विकासाला प्राधान्य असलेल्या 14 प्रमुख विषयांचा विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती उपेश चव्हाण, श्रीमती पुष्पा वाघाडे, श्रीमती आशा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अकुंश केदार तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विकास कामांची गती वाढवतांना निर्णय घेताना होणारा विलंब टाळून प्रत्येक फाईलवर 24 तासात निर्णय घेवून अंमलबजावणीला विलंब होणार नाही याची दक्षता विभाग प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक विलंब होणाऱ्या विकास कामाबद्दल जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेतर्फे विकास कामांचा कालबध्द आराखडा तयार करण्यात आला असून त्याअनुषंगाने विभागनिहाय कामांना सुरुवात झाली आहे. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत बचतगटाच्या माध्यमातून जिल्हयात 130 हरीतपट्टे तयार करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 47 हरीतपट्टे निश्चित करण्यात आले असून या कामांना लवकरच सुरुवात होत आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर सुमारे चार हजार किलोमीटरचे वृक्षारोपण करण्यात येणार असून ही सर्व कामे बचतगटाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करतानाच विजेचे बिल जास्त असल्यामुळे जिल्हयातील 759 शाळांना सोलर पॅनल पुरविण्यात येणार असून यासाठी महाऊर्जामार्फत संपूर्ण शाळा सोलरवर आणण्यात येतील. यासाठी 11 कोटी रुपये निधीची आवश्यकता असून यावर्षी जिल्हा नियोजनातून साडेचार कोटी रुपये देण्यात येणार आहे. जिल्हयातील 250 शाळांमध्ये डिजीटल स्मार्ट क्लासरुम तयार करण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
                                                     दररोज शंभर घरांचे बांधकाम
प्रधानमंत्री ग्रामआवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविल्यामुळे जिल्हयात दररोज शंभर घरे पूर्ण करण्यात येत असून त्यापैकी 1 हजार 200 घरे बांधून पूर्ण झाली आहे. घरकुल बांधकामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करुन जिल्हयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच गट-ड अंतर्गत जिल्हयात 95 हजार घरकुल बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तात्काळ निर्णय घेवून अशा घरांना मान्यता देण्यासंदर्भातही यावेळी सूचना देण्यात आल्या.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्हयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त कामांना मंजुरी दिली असून सुमारे सहाशे किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. ही कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना नियमित बैठकी घ्याव्यात, अशा सूचना यावेळी दिल्यात.
जिल्हयातील बाधित व अबाधित क्षेत्रातील दिव्यांगांना यंत्रावर चालणारी तीनचाकी सायकल देण्यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून 4 कोटी 50 लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून दिव्यांगांना यांत्रिक तीनचाकी सायकलचे तात्काळ वितरण करण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याचे स्थानांतरण, अतिदूर्गम व आदिवासी भागातील शाळांना, अंगणवाड्यांना मदरडेअरीचे पोष्टीक दूध पुरविण्यात यावे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत अभिलेखे व्यवस्थापन मानवसंपदाअंतर्गत ई सर्विसबुक, प्रत्येक कामे वेळेत व काटेकोरपणे व्हावीत व जनतेला गतीमानतेने सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हास्तरावर केवळ महिन्यातून एकदाच आढावा बैठक घेण्यात येईल. इतर वेळेस विभाग प्रमुख व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात जावून जनतेची कामे करावित असे आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. यासाठी भरारी पथकाद्वारे आकस्मीक पाहणी करण्यात येणार आहे. या भेटीमध्ये उपस्थिती लोकाभिमूख सेवा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, कुपोषण निर्मूलन सुरक्षिता आदी बाबीची पाहणी करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर व इतर सभापतींनी विकास कामांच्या अंमलबजावणी संदर्भात विविध सूचना केल्यात.
00000000 

No comments:

Post a Comment