हरित
महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक महत्वाकांक्षी पाऊल
मुंबई दि. २७: येत्या
२०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लावण्यात येणार असून या वृक्ष लागवडीचे
जिल्हानिहाय,
यंत्रणानिहाय
आणि ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे, अशी माहिती वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यात १ जुलै २०१६
रोजी एका दिवसात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८२ लाख वृक्ष लावून
पूर्णत्वाला गेल्यानंतर ३ वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वन विभागाने
निश्चित केले होते असे सांगून वनमंत्री म्हणाले, त्यापैकी २०१७ च्या
पावसाळ्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत
चार कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प 5 कोटी ४३ लाख वृक्षलागवड होऊन पूर्णत्वाला गेला. २०१८
च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्षलागवड करावयाची होती, हा संकल्प ही व्यापक
लोकसहभागाने पूर्ण होऊन राज्यात जवळपास १५ कोटी ८८ लाख वृक्ष लागले. ५० कोटी
वृक्षलागवडीतील तिसरा टप्पा ३३ कोटी वृक्षलागवडीचा आहे. यात वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि वन विकास
महामंडळ या वनविभाग आणि अखत्यारितील शाखांमार्फत १८ कोटी ७५ लाख वृक्ष लागणार
आहेत. यात वन विभाग ७.२९ कोटी, सामाजिक वनीकरण शाखा ७.२९ कोटी आणि वन विकास महामंडळ
४.१७ कोटी वृक्ष लावणार आहे. इतर यंत्रणांना यामध्ये ६.२५ कोटी तर ग्रामपंचायतींना
८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
हे उद्दिष्ट यशस्वीपणे
पार पाडण्यासाठी १० टक्के अधिक वृक्षलागवडीचे नियोजन करावे, अशा सूचना सर्वांना
देण्यात आल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, ज्या प्रशासकीय विभागांना
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या
कार्यक्रमावरील खर्चामधून ०.५ टक्क्यांच्या मर्यादेत वृक्षलागवड आणि संगोपनासाठी
तरतूद उपलब्ध करून घ्यावी, ३३ कोटी वृक्षलागवडीसाठीची लॅण्ड बँक निश्चित करावी, रोपांची निर्मिती, लोकसहभागाच्या
आराखड्याची निश्चिती, या
आणि यासारख्या कामांच्या नियोजनावर आतापासूनच काम सुरु करावे, असे निदेशही त्यांना
देण्यात आले आहेत. हरित महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांना मिळून हे आणखी एक
महत्वाकांक्षी पाऊल टाकायचे आहे, सध्याचे २० टक्क्यांचे वन क्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत
न्यायचे आहे,
त्यामुळे
वृक्ष लागवडीची ही लोकचळवळ हरित महाराष्ट्राच्या एक ध्येयाने पुढे न्यायची आहे,
असेही ते म्हणाले.
००००
No comments:
Post a Comment