मुंबई, दि. 11 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकांसाठी राखीव खाटांची संख्या व त्यांची उपलब्धता यांची माहिती सर्वसामान्यांना
व्हावी,
यासाठी
मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या स्मार्ट टीव्ही
प्रकल्पाचा आढावा आज विधी व न्याय राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आढावा घेतला.
मुंबईतील महत्वाच्या के. ई एम, नायर, जे. जे, सेंट जॉर्ज, सायन हॉस्पिटल आदी
शासकीय सार्वजनिक रुग्णालयांमध्ये स्मार्ट टिव्ही प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
या पथदर्शी प्रकल्पांचा आज डॉ. पाटील यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या
बैठकीमध्ये आढावा घेतला. यावेळी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्यासह विधी व
न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध सरकारी रुग्णालयांचे तसेच वैद्यकीय
महाविद्यालयाचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.
राज्यातील व देशातील रुग्ण विविध उपचारांसाठी
मुंबईमध्ये येत असतात. परंतु येथील शासकीय रुग्णालयांत जागेच्या उपलब्ध अभावी
त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकत नाहीत. मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांकरिता राखीव असलेल्या खाटांची संख्या व त्यांची
उपलब्धता या रुग्णांना तात्काळ माहिती व्हावी, जेणेकरून रुग्णास शासकीय
रुग्णालयांमध्ये योग्य प्रकारे उपचार होऊ शकेल, या उद्देशाने लावलेल्या
स्मार्ट टिव्ही प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उपयुक्ततेबद्दल व
धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना अधिकाधिक कशी सुविधा मिळेल यासाठी डॉ. पाटील
यांनी आज आढावा घेतला. धर्मादाय संघटना व रुग्णालय यांनी समन्वयाने काम करुन
रुग्णांना अधिकाधिक कसा फायदा होईल, यासाठी सुसूत्रता आणण्याचे निर्देश डॉ.पाटील यांनी
यावेळी दिले.
००००


No comments:
Post a Comment