रक्षा अभियानाचा
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 11 : प्रत्येक बालकाला सुदृढ बालपण
मिळाले पाहिजे. हा बालकांचा हक्क आहे. त्यांच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी
पोषक आणि संरक्षित वातावरण असणे आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षकांनी मुलांच्या अडचणी
समजून घेऊन त्यांचे समुपदेशन केले पाहिजे, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे
यांनी आज येथे सांगितले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने
आयोजित केलेल्या ‘रक्षा अभियाना’चा शुभारंभ श्री. तावडे यांच्या हस्ते आज एसएनडीटी
कॅम्पसमध्ये झाला. यावेळी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, एसएनडीटी
विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, बाल हक्क आयोगाच्या सचिव सीमा व्यास, सर्व
मुख्याध्यापक उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, मुख्याध्यापकांनी शाळेची
बदनामी होईल म्हणून एखादी घटना घडली तर ती लपवून ठेवू नये. संबंधित मुलांना
विश्वासात घेऊन त्याच्या अडचणींना समजून त्याला आधार द्यावा. मुलांच्या रक्षणासाठी
चिराग ॲप व पोक्सो ई बॉक्स विषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. त्यामुळे बालकांचे
होणारे शोषण व अत्याचारांवर आळा बसेल. शाळांची गुणवत्ता तपासताना मुलांच्या
हक्कासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही याची सुद्धा तपासणी करण्यात
येईल. बाल हक्क आयोगाच्या माध्यमातून बालकांशी संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय
घडवून शाळा, महाविद्यालयांमध्ये संपर्क अभियान राबविणे, कार्यशाळेचे आयोजन,
परिसंवाद, शाळेय समिती व समुपदेश प्रशिक्षण वर्ग, चिराग ॲप व पोक्सो ई बॉक्स विषयी
जनजागृती राज्यातील सर्व शाळांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
श्री. घुगे म्हणाले, राज्यातील सर्व बालकांचे
संरक्षण व्हावे यासाठी रक्षा अभियान सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकत्वाची
भूमिका समाजातील सर्व घटकांनी घ्यायला हवी. शालेय शिक्षण, गृह, महिला व बाल विकास
विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून रक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. भावी
पिढी ही शारीरिक, भावनिक, मानसिक दृष्ट्या सुदृढ व्हावी याकरिता आयोगाने हे पाऊल
उचलले आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करणे हीच आयोगाची भूमिका आहे.
००००




No comments:
Post a Comment