· दुर्मिळ लोकराज्य मासिक अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, दि. 5 : लोकराज्य मासिक सर्वसामान्य नागरिकांच्या आकांक्षांचे व यशाचे हक्काचे व्यासपीठ व प्रतिबिंब बनले असून लोकराज्य सर्व नागरिकांसाठीच अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर विभागीय कार्यालय, विभागीय माहिती केंद्र व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने सहायक ग्रंथालय संचालक कार्यालय येथे दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिकाच्या अंकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन सहायक ग्रंथालय संचालक मीनाक्षी कांबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव, विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल विभा डांगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर व मान्यवर उपस्थित होते.
सहायक ग्रंथालय संचालक मीनाक्षी कांबळे म्हणाल्या, लोकराज्य मासिकातून विविध योजना व उपक्रम याबाबत अचूक माहिती मिळते. अंकांच्या विषयांमध्येही वैविध्य असते. असे कांबळे यांनी सांगितले.
विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल विभा डांगे म्हणाल्या, लोकराज्य मासिक माहिती व ज्ञानाचा अमूल्य ठेवा असून विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांव्यतिरिक्तही अन्य सर्वच नागरिकांसाठी हे मासिक उपयुक्त आहे. याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती डांगे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे म्हणाले, वाचनाचे महत्व आजही टिकून असून लोकराज्य मासिकातून विविध विषयांवरील अचूक व वस्तूनिष्ठ माहिती मिळते. त्यामुळे या अंकांचे संदर्भमूल्यही मोठे असल्याचे कुरवाडे यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक श्रीपाद गजानन सहस्त्रभोजनी यांनी दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिक अंकांच्या प्रदर्शनाला आवर्जून भेट देवून अंकांची पाहणी केली व या उपक्रमाचे कौतूक केले. यावेळी संचालक(माहिती) राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, रवि गिते, प्रवीण टाके, श्रीमती मनीषा सावळे, सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे, माहिती सहाय्यक प्रभाकर बारहाते उपस्थित होते.
लोकराज्य अंकाच्या मुखपृष्ठावर आधारीत रांगोळीने वेधले लक्ष
सहायक ग्रंथालय संचालक कार्यालयातील पवित्रा ढवळे व माधुरी बोकडे यांनी महिला दिन विशेष लोकराज्य अंकाच्या मुखपृष्ठावर आधारीत अतिशय सुरेख रांगोळी दर्शनी भागात रेखाटली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या वाचकांचे या रांगोळीने लक्ष वेधले.
|
यावेळी सहाय्यक कक्ष अधिकारी योगिता डांगरे व शांता शेंडे यांनी लोकराज्यबाबत मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांनी केले. आभार संजय देशमुख यांनी मानले. यावेळी शीर्षानंद चव्हाण तसेच सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मिलिंद टेंभुरकर, सचिन काळे व अतुल भलावी यांचे सहकार्य लाभले.
या प्रदर्शनामध्ये 1964 पासूनचे विविध विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध होते. यामध्ये प्रामुख्याने बालगंधर्व विशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर 1990), महात्मा गांधी, साने गुरुजी, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, स्वातंत्र्य दिन, अखिल भारतीय साहित्य संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन , बेटी बचाव संदर्भातील विशेषांक,शिक्षण,वन, पर्यटन यासह विविध विषयांना वाहिलेल्या विशेषांकांचा समावेश होता.
-----000-----
No comments:
Post a Comment