· दुर्मिळ लोकराज्य मासिक अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, दि. 27 : वाचनाचे महत्व आजही अनन्यसाधारण असून लोकराज्य मासिकातून विविध विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ माहिती मिळते. त्यामुळे या अंकांचे संदर्भमूल्यही मोठे असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर विभागीय कार्यालय, विभागीय माहिती केंद्र व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिका च्या अंकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे यांच्या हस्ते झाले.यावेळी विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल विभा डांगे, सहायक ग्रंथालय संचालक मीनाक्षी कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर उपस्थित होते.
सहायक ग्रंथालय संचालक मीनाक्षी कांबळे म्हणाल्या, लोकराज्य मासिकाचे स्वरूप आकर्षक व आशयसंपन्न असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-यांसाठी लोकराज्य हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्य मासिकातून विविध योजना व उपक्रम याबाबत अचूक माहिती मिळते. अंकांच्या विषयांमध्येही वैविध्य असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल विभा डांगे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना व उपक्रम याबाबतची उपयुक्त व अचूक माहिती लोकराज्य मासिकाद्वारे नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येते. दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिकाच्या अंकांचे प्रदर्शनव्दारे या मासिकांत होत गेलेले बदल आपल्याला पहावयास मिळतात. दुर्मिळ ‘लोकराज्य’ मासिकाचे अंक अमूल्य ठेवा असून लोकराज्य मासिक विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांव्यतिरिक्तही अन्य सर्वच नागरिकांसाठी उपयुक्त आहे. याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही श्रीमती डांगे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे म्हणाले, आजच्या माहितीयुगात आपल्यापर्यंत विविध स्वरूपाची माहिती सतत येत असते. अशावेळी त्या माहितीची सत्यता पडताळून पाहणे महत्वाचे ठरते. समृद्ध माहितीच्या आधारेच ज्ञानमार्गाकडे जाता येते. यासाठी विशिष्ट विषयांची, योजनांची संकल्पना समजून घेण्यासाठी लोकराज्य मासिक अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्य मासिकातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम व निर्णय याबाबत अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येते. विद्यार्थ्यांनीही शासनाच्या विविध योजना व उपक्रम याबाबतची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन श्री कुरवाडे यांनी केले.
जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले, लोकराज्य मासिकातून शासनाच्या विविध योजना , उपक्रम, शासननिर्णय व ध्येय्यधरणे याबाबत अचूक व सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना महत्वाच्या अशा संदर्भ साहित्यात लोकराज्य मासिक अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्य मासिक माहितीचा खजिना असून सर्वच नागरिकांसाठी हे मासिक उपयुक्त आहे. स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय्य निश्चित करून नेमकेपणाने वाटचाल केल्यास यश नक्की मिळेल अशा विश्वासही श्री गडेकर यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांनी लोकराज्य मासिकाविषयी माहिती सांगितली.लोकराज्य मासिक सर्वसामान्य नागरिकांच्या आकांक्षांचे व यशाचे हक्काचे व्यासपीठ व प्रतिबिंब बनले असल्याचे श्री करंदीकर यांनी सांगितले.
या प्रदर्शनामध्ये 1964 पासूनचे विविध विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध होते. यामध्ये प्रामुख्याने बालगंधर्वविशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर 1990), महात्मा गांधी, साने गुरुजी, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, स्वातंत्र्य दिन, अखिल भारतीय साहित्य संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक,निवडणूक, शेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह विविध विषयांना वाहिलेल्या विशेषांकांचा समावेश होता. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मिलिंद टेंभुरकर, सचिन काळे व अतुल भलावी यांचे तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथील कर्मचा-यांचे सहकार्य लाभले. यावेळी ‘लोकराज्य’वर आधारीत अतिशय सुरेख रांगोळी दर्शनी भागात रेखाटली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या वाचकांचे या रांगोळीने लक्ष वेधले.
-----000-----
No comments:
Post a Comment