Friday, 2 November 2018

लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील 35 कोटी 92 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता - बबनराव लोणीकर


            मुंबई, दि. 2 : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातील मुरुड (बुद्रुक), गावासाठी 35 कोटी 92 लाख रु. किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            श्री. लोणीकर म्हणाले, मुरुड (बु.) हे लातूर जिल्हयातील सर्वात मोठे गाव असून सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मुरुड हे प्रसिध्द शैक्षणिक व बाजारपेठेचे केंद्र आहे. या गावाची लोकसंख्या 30 ते 35 हजार आहे. रायगव्हाण प्रकल्पावरुन मुरुड व 5 गावांसाठीची योजना सन 1996 पासून कार्यान्वित आहे. परंतु रायगव्हाण प्रकल्प शाश्वत नसल्याने दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नवीन योजना प्रस्तावित केलेली होती. परंतु मांजरा प्रकल्पातच पाणी साठा कमी झाल्यामुळे मान्यतेला विलंब झालेला होता. कायम टँकरची परिस्थिती लक्षात घेता ही योजना मंजूर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले.
            नवीन योजनेची किंमत रु.35 कोटी 92 लाख असून याचा उद्भव मांजरा प्रकल्प आहे. सन 2040 ची संकल्पित 50 हजार लोकसंख्या गृहित धरुन त्यादृष्टीने सदर योजनेचे संकल्पचित्र तयार केलेले आहे. ही योजना दरडोई निकषाच्या वरची असूनही त्याला मान्यता देण्यात येत आहे. यापुढे घरगुती नळ जोडण्यात येऊन ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांच्या खर्चाने जलमापक बसवून पाण्याचा सुयोग्य वापर करावा व पाणीपट्टीची वसुली 100% करुन या योजनेची देखभाल दुरुस्ती केल्यास या योजनेतून शुध्द व शाश्वत पिण्याचे पाणी मुरुडकरांना मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत करण्यात येणार असून लवकरच निविदा प्राप्त करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.लोणीकर यांनी दिली.      
000

No comments:

Post a Comment