Thursday, 29 November 2018

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य शासननिर्णय निर्गमित- सुधीर मुनगंटीवार



मुंबई, दि. 29 :  वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी झाल्यास तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देताना यासंबंधीचा शासननिर्णय कालच निर्गमित झाल्याचे सांगितले.
 ते पुढे म्हणाले, वरील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारे अर्थसहाय्य वाढविण्यात येऊन आता ते १५ लाख इतके करण्यात आले आहे.  तर गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजार भावाप्रमाणे असलेल्या किंमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रक्कमेपैकी ३ लाख रुपयांची रक्कम देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे दिली जाईल. उर्वरित १२ लाख रुपयांची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यात ठेव स्वरूपात जमा करण्यात येईल.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय रक्कम देण्यासाठी, पशुधनाच्या मृत्यूमुळे देण्यात येणारे अर्थसहाय्य देण्यासाठी पूर्वीचे नियम यापूर्वी होते तसेच लागू राहतील, असेही ते म्हणाले.
यासंबंधीचा शासन निर्णय दि. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी वन विभागाने निर्गमित केल्याचेही त्यांनी सांगितले.
०००



No comments:

Post a Comment