मुंबई, दि. 29 : पात्र माथाडी कामगारांनाच माथाडी कायद्याचा लाभ मिळावा यासाठी
माथाडी कामगारांची यादी लवकरच ऑनलाईन करणार असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी
पाटील-निलंगेकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.
माथाडी कामगार व त्यांच्या प्रश्नाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रवीण
दरेकर यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. पाटील-निलंगेकर बोलत
होते.
यावेळी श्री. पाटील-निलंगेकर म्हणाले, माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळांच्या
कामकाजाची व मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी अधिनियमातील
तरतुदीनुसार करण्यात येते किंवा कसे, याबाबत चौकशी करुन शासनास शिफारशी करण्याबाबत
माथाडी व सुरक्षा रक्षक अधिनियमातील तरतुदीनुसार एक सदस्य चौकशी आयोग दि. 10
एप्रिल 2018 रोजी गठीत करण्यात आला होता. या चौकशी आयोगाने माथाडी मंडळातील
कामकाजाबाबत त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षक मंडळातील कामकाजाबाबत आपला गोपनीय अहवाल
शासनास सादर केलेला आहे. चौकशी आयोगाने दोन्ही मंडळांचा आस्थापना विषयक प्रशासकीय
बाबी त्याचप्रमाणे अधिनियमातील योजनांची अंमलबजावणी याबाबत सखोल चौकशी करुन शासनास
शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीनुसार सर्व माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांचे
कामकाजामध्ये सुसूत्रिकरण व अधिनियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने
माथाडी कामगार, सुरक्षा रक्षक व त्यांच्या संघटना यांना विश्वासात घेऊन आवश्यक ती
कार्यवाही करण्यात येणार आहे.
या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांनी
सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment