Saturday, 3 November 2018

कृषी सिंचन योजना वरदानच...!


विशेष वृत्त
       शेती आणि शाश्वत सिंचन या एकमेकास पूरक बाबी आहेत. त्यामुळेच पाण्याविना शेती नाहीच. म्हणूनच शेती म्हटले की सिंचनाच्या सोयी या आल्याच. निसर्गाचा लहरीपणा, त्यात अनियमित पाऊस पारंपरिक शेतीच्या उत्पादनाला जीवनदान देणार तरी कसा? हा प्रश्न सातत्याने शेतकऱ्यांना पडत असतो. परंतु, याचेही समाधान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेने शोधले आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सोय केली जाते. अर्थातच या योजनेकरिता शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळतेच.
            प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मुळात अल्प, अत्यल्प भूधारकांसाठी आहे. त्यासोबतच इतरही शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. परंतु अनुदानाची टक्केवारी मात्र दोघांकरिता वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. 5 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीकरिता 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान उपलब्ध करुन दिले जाते.
            कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या याच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे हिंगणा तालुक्यातील लाडगाव येथील 2 एकर मालकीचा शेतकरी प्रमोद वासुदेवराव आष्टनकर लाखाची उलाढाल करतो आहे.
            प्रमोद आष्टनकर यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमार्फत आपल्या शेतात ठिबक सिंचनाचा वापर करतात. 1.20 हेक्टर जमिनीवर लावण्यात आलेल्या ठिबक सिंचन बसविण्यासाठी प्रमोदला 1 लाख 48 हजार रुपयाचा खर्च आला. यातील 67 हजार 500 रुपयांचे अनुदान हे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमार्फत प्राप्त झाल्याने शेतात बारमाही आणि 24 तास पाणी उपलब्ध झाले. याशिवाय जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासही मदत झाली. ठिबक सिंचनाची सोय झाल्यावर त्यांनी 0.80 हेक्टर जमिनीवर अभिलाष वाणाच्या टोमॅटोची तर 0.40 हेक्टरवर तैवान 786 या पपई वाणाची लागवड केली. सिंचनाची योग्य सोय झाल्याने प्रमोद आष्टनकर यांनी टोमॅटोचे 35 टन तर पपईचे 90 टन उत्पादन घेतले. दोन्ही उत्पादनातून खर्च वजा करता प्रमोद आष्टनकर यांनी 5 लाख रुपयाचा नफा मिळविला आहे.
            मात्र एक वर्षात ठिबक सिंचनाने त्यांच्या शेतीतील पिकाला जीवनदान दिलेच, शिवाय शेतीच्या उत्पादनाने त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणीही मिळाली आहे. त्यामुळेच का होईना प्रमोद आष्टनकर सर्व तरुण शेतकऱ्यांना नेहमी एकच सल्ला देतात. शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीसह उत्पादनाला नवी बाजारपेठ उपलब्ध करुन द्या.
मिनाक्षी कोल्हे
 9921501856
*****

No comments:

Post a Comment