· शाश्वत सिंचनामुळे उत्पादनात दुप्पट वाढ
· 363.81 टिसीएम जलसाठा उपलब्ध
· पाच बंधाऱ्यांच्या खोलीकरणामुळे मुबलक पाणी
· भूगर्भातील पाणी पातळीत सरासरी 6 फुटाने वाढ
जलयुक्त शिवार अभियानाला लोकसहभागाची जोड मिळाल्यामुळे नाल्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविण्यासोबतच नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे हिंगणा तालुक्यातील कोहळा रीठी या शिवारातील सुमारे 125 एकर जमिनीला शाश्वत सिंचनाचा लाभ झाला आहे. सिंचनासोबतच टाकळघाट येथील सुमारे सहा हजार लोकसंख्येला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. जलयुक्त शिवारमुळे केवळ शेतीलाच नव्हेतर गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यालाही मदत झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नदी व नाल्याद्वारेवाहून जाणारे पाणी
अडवून त्याचा शाश्वत सिंचनासाठी वापर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत
हिंगणा तालुक्यातील मौजा खापरी (मोरे) ग्रामपंचायत अंतर्गत कोहळा (रीठी) या गावात
राबविलेल्या नाला खोलीकरण तसेच सिमेंट नालाबांध व जुन्या बंधाऱ्यांचे दुरुस्ती या
उपक्रमामुळे 363.81 टिसीएम जलसाठा निर्माण झाला आहे. गावातील एकूण पाण्याची गरज
पूर्ण केल्यानंतरही टाकळघाट या गावाला निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा
टंचाईवर मात करण्यासाठी सरासरी अडीच लाख लिटर पाणी उपलब्ध होत असल्यामुळे सहा हजार
लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कोहळा रीठी या शिवारातून जाणाऱ्या नाल्यावर तीन
ठिकाणी सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले असून जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती
करण्यात आली आहे. या नाल्यात सुमारे एक हजार ते अकराशे मीटर लांबीचे
नालाखोलीकरणाचे काम पूर्ण केल्यामुळे हा संपूर्ण नाला जलसाठायुक्त झाला आहे.
पाण्याची खोली चार ते पाच फूटपर्यंत असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सहज
उपलब्ध झाले आहे. या परिसरातील शेतकरी शेतातील पिके वाचविण्यासोबतच रब्बी हंगामात
विविध पिके घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हिंगणा तालुक्यातील मौजा खापरीमध्ये या परिसरातील नाल्याद्वारे वाहून जाणारे
पाणी अडविण्यासाठी सन 2016-17 करिता
ग्रामसभेच्या ठरावानुसार जलयुक्त शिवारअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्रामस्थांनी
सुचविल्यानुसार ढाळीचे बांध, सिमेंट नालाबांध व नाला खोलीकरणाची कामे घेण्यात
आलीत. यासाठी या गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात आला. त्यानुसार तीन नवीन सिमेंट बंधारे व त्यासोबत
नाल्याचे खोलीकरण करण्यात आले, तसेच जुन्या नाल्याची दुरुस्ती व खोलीकरण
केल्यामुळे नाल्याद्वारे वाहून जाणारे संपूर्ण पाणी अडविण्यात आले. या
आराखडयानुसार 626.34 टिएमसी पाणीसाठा अपेक्षित होता. त्यानुसार शेतकऱ्यांना
आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध झाले आहे. या नालाखोलीकरणामुळे उपलब्ध झालेल्या
पाणीसाठ्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करण्याच्या दृष्टीने टाकळघाट येथील सरपंच
श्रीमती अर्चना हरिश्चंद्र अवचट यांनी पिण्याच्या पाण्याची विहीर खोदण्यासाठी जागा
उपलब्ध करुन दिल्यानंतर ग्रामपंचायततर्फे पाण्याची टाकी बांधून गावाला पिण्याच्या
पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ग्रामपंचायतला मिळणाऱ्या 14 व्या
वित्त आयोगातून निधीसुध्दा उपलब्ध करुन दिल्यामुळे आज सहा हजार लोकसंख्येला
पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असल्याचे सरपंच श्रीमती अवचट यांनी सांगितले.
सोयाबिन झाले दुप्पट
टाकळघाट येथील शेतकरी विजय राजबिंडे यांनी 1.41 हेक्टर आर क्षेत्रात खरीप
हंगामात सोयाबिनची पेरणी केली. पावसाच्या खंडामुळे सोयाबिनचे पीक वाचविण्यासाठी
नाला खोलीकरणामुळे निर्माण झालेल्या जलसाठ्यातून विद्युत पंपाद्वारे पाणी दिल्याने
19 क्विंटल सोयाबिनचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. यापूर्वी केवळ 10 क्विंटल
सोयाबिनचे उत्पादन होत होते. रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याचे पीक येत असून उन्हाळा
संपेपर्यंत नाल्यात पाणी उपलब्ध असल्यामुळे दुप्पट उत्पादन होईल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला. जलयुक्तमुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्यातून याच परिसरातील 20
शेतकऱ्याने इलेक्ट्रीक मशीनद्वारे आपल्या शेतापर्यंत पाणी पोहचविले आहे. गजानन
सावरकर यांनी नाला खोलीकरणामुळे चार
एकरातील सोयाबिन वाचवू शकलो आणि दुप्पट उत्पादन झाल्याचे यावेळी सांगितले.
कोहळा रीठी या गावाच्या शिवारातील बहुतांश शेती पडीक होती. तसेच खरीप
हंगामामध्ये केवळ कापूस व तूर ही दोनच पिके घेतल्या जात होती. परंतु नाला खोलीकरण
व सिमेंट बंधाऱ्यामुळे दोन पिके घेणे शक्य झाले आहे. विजय मारवडकर, श्री. नंदागवळी
आदी शेतकऱ्यांनी पडीक जमीन ओलिताखाली आणण्यासाठी जलयुक्त शिवाराची उपयुक्तता
यावेळी व्यक्त केली. कृषी विभागाने याच शिवारातील 80 हेक्टर शेतीमध्ये ढाळीचे बांध
बांधून शेतातील पाणी शेतातच अडविले आहे. या शिवारातून वाहणारा नाला संपूर्ण गाळाने
भरला होता. त्यामुळे संपूर्ण पाणी वाहून जात होते. परंतु नाला खोलीकरण व सिमेंट
बंधाऱ्यामुळे दोन ते अडीच फूट भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे.
हिंगणा पंचायत समितीचे उपसभापती हरिश्चंद्र अवचट यांनी जलयुक्तच्या कामामुळे
साडेतीन एकर परिसरातील संत्राबाग वाचविणे सहज शक्य झाले आहे. विहिरीतील पाण्याचे
पातळीतर वाढली परंतु त्यासोबत मे, जूनपर्यंत नाला खोलीकरणामुळे पाणीसुध्दा उपलब्ध
झाले आहे. नाला खोलीकरणाच्या नवीन कामामुळे 267.80 टिएमसी पाणी उपलब्ध झाले आहे.
तसेच नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविणे सुध्दा शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी शेतातील पिके वाचविण्यासाठी जलयुक्तमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा
मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद
शेंडे यांनी यावेळी दिली. जलयुक्त शिवार अभियानाच्या नियोजनापासून तर लोकसहभाग
मिळविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, मंडळ अधिकारी संजय भगत, सुरेश
मलघडे, कृषी पर्यवेक्षक विराज देशमुख व सहायक निरंजन गहूकर यांनी केलेल्या
प्रयत्नामुळेच कोहळा रीठीचे शिवार जलयुक्त झाले आहे. शेतीसोबतच पिण्याच्या
पाण्यासाठी उपलब्ध झालेल्या जलसाठ्याचा लाभ प्रत्येक शेतकरी घेत असल्यामुळे आर्थिक
फायदा झाल्यामुळे निश्चितच समाधानी झाला आहे.
-
अनिल गडेकर
9890157788
****
No comments:
Post a Comment