Monday 31 December 2018

दारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना होणार ६ महिन्यांसाठी निलंबित - परिवहन मंत्री दिवाकर रावते

विमा नसलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास होणार जप्तीची कारवाई

मुंबईदि. ३१ : दारु पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना (लायसन्स) ६ महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री व रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. वाढते अपघात रोखण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीत व्यापक चर्चा होऊन विविध निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस गृह राज्यमंत्री दीपक केसरकरपरिवहन आयुक्त शेखर चन्नेएसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओलसार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुप यादवसचिव (रस्ते) सी. पी. जोशीअपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कोरगावकरसहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेशकुमार यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अनेक अपघात हे वाहनचालकांनी दारुच्या नशेत वाहने चालविल्याने होत असल्याचे विविध अहवालातून निष्पन्न झाले आहे. हे रोखण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलीसांमार्फत सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील २ महिन्यात राज्यात १२ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कारवाया ह्या दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी आहेत. आता अशा दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी त्यांचा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.
विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास आणि दुर्देवाने अशा वाहनाचा अपघात झाल्यास जखमी किंवा मृतास कोणत्याही प्रकारचे विमा लाभ मिळत नाहीत. सध्या अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण आता यापुढे अशा वाहनांवर जागेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित वाहन ताब्यात घेतले जाईल. वाहनधारकाने विमा घेऊन आल्यानंतर आणि अधिकृत दंड भरल्यानंतरच वाहन परत देण्यात येईलअसे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले. याशिवाय ज्या वाहनाचा विमा नजीकच्या काळात संपणार आहे त्यांना पत्राद्वारे तशी सूचना पाठविणारी यंत्रणा निर्माण करण्यात यावी. राज्यातील बेरोजगार तरुणबचतगट आदींना हे काम देण्यात यावे. यासाठी होणारा खर्च वाहनधारकांकडून घेता येईल. यामुळे रोजगार निर्माण होण्याबरोबरच वाहनधारकांचीही सोय होऊ शकेलअशी सूचना मंत्री श्री. रावते यांनी बैठकीत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
ओव्हरलोड माल वाहतूक वाहनांवर होणार गुन्हा दाखल
राज्यातील अनेक खासगी प्रवासी वाहने (ट्रॅव्हल्स) हे पार्सल वाहतूककुरिअर वाहतूक किंवा माल वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ट्रॅव्हल्स वाहनांना फक्त प्रवासी वाहतुकीसाठी परवाने देण्यात आले आहेत. पण अनेक ट्रॅव्हल्स बेकायदेशीररित्या माल वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांवरही कारवाई करण्यात यावीअशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. लोकांनीही अशा वाहनांमधून प्रवास करु नयेअसे आवाहन मंत्री श्री. रावते यांनी यावेळी केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिरिक्त भार वाहणाऱ्या (ओव्हरलोड) मालवाहतूक वाहनांवर फक्त दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात यावेतअशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. अशा ओव्हरलोड वाहनांमुळे अपघात होण्याबरोबरच रस्त्यांची अवस्थाही खराब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  याशिवाय वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणारे स्पीड गव्हर्नर तोडणाऱ्या खासगी वाहनांवरही कारवाई करावीअशा सूचना मंत्री श्री. रावते यांनी यावेळी दिल्या.

अवजड वाहनांबाबत प्रबोधन करा – राज्यमंत्री दीपक केसरकर
राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी अवजड वाहनांबाबत सूचना केली. महामार्गावर बऱ्याच वेळा अवजड वाहने उजव्या बाजूने वाहतूक करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होतेअपघात होतात. अशा वाहनचालकांनी डाव्या बाजूने वाहन चालविण्याबाबत त्यांचे  माहितीपत्रकांद्वारे प्रबोधन करण्यात यावे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी. रस्त्याची उजवी बाजू ओव्हरटेकसाठी खुली राहील याबाबत वाहतूक पोलीसांना दक्षता घ्यावीअशा सूचना राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिल्या.   
नोव्हेंबर अखेर २४६ कोटी रुपयांचा रस्ते सुरक्षा निधी उपलब्ध झाला आहे. अपघात रोखण्याकरिता विविध उपाययोजनांसाठी हा निधी खर्च करावयाचा आहे. पोलीस दलासाठी आवश्यक स्पीड गनअल्कोहोल मीटरइंटरसेप्टर वाहनेस्पीड कॅमेरे आदींच्या खरेदीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात यावाअसे निर्देश मंत्री श्री. रावते यांनी यावेळी दिले.
                                                                              ०००००

No comments:

Post a Comment