Tuesday, 4 December 2018

लोकराज्यच्या क्रांतिसूर्य या विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन



* चंद्रशेखर बावनकुळे अतिथी संपादक

नागपूर दि. 4: लोकराज्य मासिकाच्या डिसेंबर महिन्याच्या ‘क्रांतिसूर्याला विनम्र अभिवादन’ या विशेषांकाचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अतिथी संपादक असून महापरिनिर्वाण दिन विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री तथा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित विमोचन कार्यक्रमास महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदी उपस्थित होते. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन विशेषांकावर लोकराज्य आधारित असून त्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्ञानमार्गी, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, अर्थप्रशासक, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राजकीय मुत्सद्दी, कायदामंत्री, संविधानाचे प्रमुख शिल्पकार, भाषावार प्रांतरचनेचे विश्लेषक आदि बाबतीत त्यांच्यावर मान्यवरांचे वाचनिय लेख आहेत. त्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचा आपले संविधान, आपले सामर्थ्य हा वाचनिय लेख असून, सामाजिक लोकशाही, नि:स्वार्थ सेवा आदि विषयांवर लेख आहेत.
पूर्वीपेक्षा अधिक, पूर्वीपेक्षा उत्तमया ब्रिदवाक्यावर राज्य शासनाने गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या लोककल्याणकारी अशा विविध योजनांच्या यशकथाही आहेत. त्यामध्ये जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, रोजगार व उद्योगनिर्मितीसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यांच्या प्रेरणादायी यशकथांनी भरलेला हा विशेषांक आहे.
            त्या यशकथांमध्ये शेत बहरले, समृद्धी आली, कृषिपंपाने द्राक्षबाग फुलली,  धवलक्रांतिची प्रेरणा, रोल मॉडेल, वाद मिटले, प्रगती झाली, मृदा परीक्षणाचा फायदा, फुलशेती, कृषी  सिंचन: दुप्पट उत्पादन, आर्थिक स्थैर्य,  शिवारात पाणी, विकासाची ग्वाही माळरानावर मत्स्यशेती, टाकळघाटला पिण्याचे पाणी, शंभर शेततळ्यांचे गाव, दुष्काळातला आधार, लाख मोलाचे शेततळे,नवी दिशा, रोजगार मिळाला नैराश्य गेले,अर्थकारणाला बांबूमुळे कलाटणी, मी मालक, फेटरी: उत्कृष्ट आरोग्यसेवा, सौर ऊर्जेवर सिंचन, करिअरचा प्रकाशमार्ग, आश्रमशाळांचा कायापालट, उपाय आणि दिलासा आदि यशकथांचा या विशेषांकात समावेश आहे.
 या विशेषांकाचे अतिथी संपादक ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांनी ऊर्जा शक्ती, आर्थिक  आणि सामाजिक परिवर्तन यांवर त्यांनी त्यांच्या अतिथी संपादकीयामध्ये प्रकाश टाकला असून, दोन्ही लेख वाचनिय लेख आहेत.
 प्रारंभी जिल्हा माहितकी अधिकारी अनिल गडेकर यांनी स्वागत करुन विशेषांकाबद्दल माहिती दिली. लोकराज्य मासिकाचा विशेषांक सर्व पुस्तक विक्रेत्याकडे तसेच जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन, सिव्हिल लाईन्स येथे उपलब्ध आहे.
*****

No comments:

Post a Comment